Thu, Jan 15, 2026
Media सातारा जिल्हा

पहाड पुन्हा गदगदला, पण हर्षभरीत होऊन

पहाड पुन्हा गदगदला, पण हर्षभरीत होऊन
Ashok Ithape
  • PublishedFebruary 15, 2024

राहुल तांबोळी, भुईंज :

जिह्यातील तमाम पत्रकारांना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं ते साकारलं. ते किती भव्य, अफाट, देखणं? हे प्रत्यक्ष पाहिल्यानंतरच कळेल. अशा पत्रकार भवनाचे उदघाटन अत्यंत दिमाखदार सोहळ्यात झालं. अगदी एखादा सामान्य पत्रकार देखील साताऱ्यातील ही चार मजली इमारत आता माझी म्हणून अभिमानाने सर्वांना सांगू, दाखवू शकतो. तेवढा आपलेपणा, विश्वास या कार्यक्रमातूनही सर्व पत्रकारांना मिळाला.

हे सर्व साकारताना किती कळा सोसल्या हे तर सर्वांना माहिती आहेच. मात्र त्या कळा सोसून प्रसवलेल्या या भवनाच्या आजच्या बारशात हरिष पाटणे सारखा पहाड इतक्या वेळा गदगदला, की तो फक्त ढसाढसा रडायचा बाकी राहिला होता.

जिल्हाध्यक्ष हरिष पाटणे यांना अति भावूक झाल्याचं यापूर्वी फक्त एकदा पाहिलं. ते दुःखाने होतं. त्यांचे वडील वसंतराव पाटणे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना आणि नंतर तर ते गेलेच तेव्हा. त्यावेळी हरिपूरमध्ये अंत्यसंस्कारावेळी माझाही खांदा या मित्राच्या अश्रूंनी भिजला होता. त्यानंतर या पहाडाचे अश्रू पाहिले ते काल.

कालचे अश्रू मात्र कर्तव्यपूर्तीचे, व्यासपीठावरील सर्व मान्यवरांच्या आणि व्यासपिठा समोरील तमाम  पत्रकारांच्या अलोट प्रेमाने आलेल्या भरावलेपणातून होते.

विनोद कुलकर्णी बोलत असतानाच हा पहाड जो गदगदायला सुरुवात झाली तो पुढे संपूर्ण कार्यक्रमभर अनेकदा जणू डोळ्यांतून भरून पावला. खमक्या पुढाऱ्याचे हे संवेदनशील रूप अनेकांच्या हृदयात कालवाकालव करून टाकणारे.

हरिष पाटणे व विनोद कुलकर्णी यांनी या भवनाच्या निर्मितीचा जो प्रवास सांगितला तो पाहता हा कार्यक्रम एखाद्या मोठ्या मैदानावर सारा जिल्हा गोळा करून सहजपणे घेता आला असता. त्या अर्थाने स्वतःचं मखर मोठ्या प्रमाणावर सजवनं सहज शक्य होतं. पण या कार्यक्रमाच्या केंद्रस्थानी फक्त आणि फक्त जिल्ह्यातील पत्रकार ठेवले. प्रत्येकाला फेटा काय, पाण्यापासून जेवणापर्यंत उत्तम व्यवस्था काय, नियोजनाची बांधेसूद बांधनी काय. सर्व कसं काटेकोरपणे.

या भीम पराक्रमाने खरं तर इतर कोण असतं तर फुशारकी आणि बडेजावकीत मदमस्त होऊन गेलं असतं. पण वारंवार उदघोष झाला तो हे साकारण्यासाठी ज्यांनी हातभार लावला त्या मदतशील हातांचा, पत्रकारांच्या एकजुटीचा. त्यात ज्येष्ठ तसेच दिवंगत पत्रकारांची आठवण आवर्जून काढली गेली. ही बाब स्वतःची मुळं जपणारी.

हा कार्यक्रम फक्त पत्रकारांशी निगडित होता. आधीच म्हटलं त्याप्रमाणे शक्य असूनही भलं मोठं स्वतःचं मखर सजवलं नाही. यातून जपली ती आपल्या सोयऱ्यांशी बांधिलकी. त्यातून जिल्ह्यातील पत्रकारांचे एक स्नेहसंमेलन, गेटटूगेदर पार पडले.

सर्वच पातळीवर प्रत्येक पत्रकाराला आपला वाटलेल्या, आपुलकीची भावना वाढवणाऱ्या, कोणाच्या मनात चुकून काही जाळी जळमटी राहिली असतील तर ती झाडून पुसून स्वच्छ करणारा हा कार्यक्रम होता. कारण, हरिष पाटणे सारखा पहाड केवळ गदगदला नाही तर या अभिमानाच्या, हरखून जावं अशा क्षणी एक वाक्य बोलून गेला, ते वाक्य होतं, आजपर्यंतच्या वाटचालीत कुठला पत्रकार चुकून दुखावला असेल तर माफी मागतो. खरं तर तसे काही नाही. कारण, ग्रामीण भागात सर्वाधिक कार्यक्रम, उपक्रम भुईंज प्रेस क्लबच्या वतीने होताना त्यांना किती त्रास आम्ही देतो, हे आमचं आम्हाला माहिती. तरीही गडी वैतागत नाही की टाळत नाही. हे वास्तव. असे असताना आनंदाने बेभान होऊन जावं अशा आयुष्यातील सर्वोच्च आनंदाच्या क्षणी भान राखून दाखवलेली ही विनम्रता भावणारी.

विनोद कुलकर्णी जे म्हटले, की हरिष उद्या राजीनामा द्यायचा विचार करतोय. मात्र हाच अध्यक्ष आणखी दहा पंधरा वर्षे हवा, तीच भावना विश्वास पवार यांनी आमच्या वतीने ठासून उपस्थितांमधून बुलंद केली. उदयनराजे,  एस. एम. देशमुख यांनी त्याची घट्ट गाठ बांधली.

हरिष पाटणे यांचे परतीचे दोर कापले ते असे. त्यामुळे राज्यभर भराऱ्या मारण्यासाठी शुभेच्छा आहेतच मात्र जिल्हाध्यक्ष हाच हवा ही भावना दृढ का? हे सांगण्यासाठी एक उदाहरण देतो. क्रांतीवीर आबासाहेब वीर आमदार, खासदार झाले. अगदी यशवंतराव चव्हाण साहेब जिल्ह्यातील माझे नेते किसन वीर आबा आहेत, असे सांगायचे.एवढे मोठे आबा आमदार, खासदार असतानाही कवठ्याच्या सरपंचपदी अखेरपर्यंत तेच होते. कवठेकरांनी आपल्या या पुढाऱ्याला गावच्या सरपंच पदावरून कधी पायउतार होऊच दिलं नाही. त्यापाठी होतं ते आपल्या आबांवरील प्रेम. त्याच प्रेमाची ग्वाही देऊन सर्व पत्रकारांचा साताऱ्यात सात बारा निर्माण केल्याबद्दल हरिष पाटणे, विनोद कुलकर्णी आणि त्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांना धन्यवाद आणि पत्रकारांच्या पुढाऱ्याचे अभिनंदन.

राहुल तांबोळी,
सर्व पदाधिकारी
भुईंज प्रेस क्लब.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!