सातारा येथील राजवाडा परिसरात रस्त्याच्या कडेला आढळला अर्धवट जळालेला मृतदेह; थरारक घटनेनं नागरिकांमध्ये खळबळ
![]()
हा प्रकार सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना निदर्शनास आला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
सातारा l महेंद्रआबा जाधव :
सातारामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजवाडा परिसरात एका व्यक्तीचा अर्धनग्न अवस्थेत जळालेला मृतदेह सापडलाय. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोपाळ विजयकुमार लकिरे असं मृत व्यक्तीचं नाव असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. प्रतापगंज पेठ येथे हा व्यक्ती राहात होता. हा प्रकार सकाळी मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना निदर्शनास आला. नागरिकांनी जवळ जाऊन पाहिले असता त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली.
मॉर्निंग वॉकला आलेल्या नागरिकांना तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच संबंधित परिसराची पाहणी केली. संबंधित व्यक्ती नगर वाचनालयाच्या शेजारी शेकोटी केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र अर्ध नग्न अवस्थेत मृतदेह सापडल्यामुळे शाहूपुरी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.













