सन्मान देवदूताचा.. निरपेक्ष पत्रकारीतेचा..!
राहुल तांबोळी l भुईंज –
पत्रकार महेंद्र जाधव (आबा ) यांचा रयत शिक्षण संस्थेच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड ता.वाई यांचेवतीने सन्मान करण्यात आला. या सन्मानाबद्दल आबांचे खूप खूप अभिनंदन आणि रयत शिक्षण संस्थेचे खुप खुप आभार.
खरे तर जेव्हा जेव्हा समाजातल्या चांगुलपणाचा सन्मान, गौरव होतो तेव्हा आनंद होतोच त्यातही ज्याच्या चांगुलपणाची नोंद करता करता थकायला होईल, माणसातील या देवदूताच्या भल्या कामांची नोंद करता करता कागदाची भेंडोळी अपुरी पडतील अशा आमच्या आबाचा सन्मान होतो तेव्हा या समाजात चांगुलपणाची नोंद आजही घेतली जाते हे पाहून मन शास्वत, आश्वासक होतं.
अनेकांना आयुष्यात उभं करणारी व्यक्ती म्हणजे आबा, स्वतःच्या खिशात फुटकी कवडी नसली तरी दहा जणांकडे हातउसनवारी करून दुसऱ्याची गरज भागवणारी व्यक्ती म्हणजे आबा, अनेकांना जीवनदान मिळावे यासाठी स्वतः मृत्यूच्या दाढेतून परतूनही धावपळ करणारी व्यक्ती म्हणजे आबा, जिथं जिथं काही सृजनशील काम सुरू असेल तिथं तिथं उभी ठाकणारी व्यक्ती म्हणजे आबा, रक्तामासाच्या नसलेल्यासाठी गहिवरणारी व्यक्ती म्हणजेही आबा, आणि स्व.श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे तथा भाऊसाहेब महाराज यांच्या कृपाछत्राखाली श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे आणि श्रीमंत छ. सौ. वहिणीसाहेब यांच्यासाठी जीव तळ हातावर धरून लढणारी व्यक्ती म्हणजेही आबा.
अशा या बहुआयामी व्यक्तिमतवाचा सन्मान भुईंज पोलीस स्टेशनचे API मा.रमेश गर्जे साहेब यांचे हस्ते व रयतचे महाविद्यालय विकास समिती सदस्य मा.भैय्यासाहेब जाधवराव प्राचार्या डाॅ. मंजुश्री बोबडे, प्रा. डाॅ. शरद पवार व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या शानदार सोहळ्यात झाला, ही अत्यंत आनंदाची, कौतुकाची आणि अभिमानाची बाब.













