मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते “ आयुष्यमान भारत” कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यातील 49 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा (स्मार्ट पी एच सी) व इतर उपक्रमांचा शुभारंभ कार्यक्रम
सातारा दि.२. : समाजातील सर्व घटकांना आरोग्य संपन्न जीवन जगण्याचा अधिकार आहे, सातारा जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार गुणवत्तापुर्ण आरोग्य सेवा देण्याचा निश्चय सातारा जिल्हा परिषदेमार्फत नेहमीच केला जातो. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केद्रांद्वारे अत्याधुनिक सुविधा व उत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र हा नाविण्यपुर्ण उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने राबविण्याचा मानस ठेवला आणि त्याचीच प्रचिती म्हणून सातारा जिल्ह्यातील 49 संस्था स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणून विकसित करण्यात येणार असून या कार्यक्रमाचा शुभारंभ तसेच नूतन 4 प्राथमिक आरोग्य केंद्रांचे ई-भूमिपूजन, प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी 6 रुग्णवाहिकांचे लोकार्पण आणि प्राथमिक आरोग्य केंद्राना II care Foundation Baramati यांनी CSR अंतर्गत दिलेल्या 125 संगणकांचा वाटप कार्यक्रम दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते बुधवार, दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी दुपारी 12.30 वा श्रीपतराव महाविद्यालय, शिरवळ ता खंडाळा जि. सातारा येथे होणार आहे.
सदर कार्यक्रमास श्री. छगन भुजबळ, मंत्री अन्न व नागरी पुरवठा, श्री. शंभूराज देसाई, मंत्री राज्य उत्पादन शुल्क, तथा पालकमंत्री सातारा व ठाणे जिल्हा, श्री अतुल सावे, मंत्री गृहनिर्माण, इतर मागास वर्ग, सामाजिक व शैक्षणिक, मागासवर्गीय विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष प्रवर्ग कल्याण या प्रमुख अतिथी यांचेसह जिल्ह्यातील सन्माननीय लोकप्रतिनिधी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
“ आयुष्यमान भारत” कार्यक्रमांतर्गत स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्र (स्मार्ट पी एच सी) या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हयातील एकुण 49 प्राथमिक आरोग्य केद्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यामध्ये जावली तालुक्यात कुडाळ, कुसुंबी, बामणोली (कसबे). कराड तालुक्यात उंब्रज, रेठरे बुद्रुक, काले, कोळे, येवती मसूर, हेळगांव, सुपने, वडगांव हवेली. खटाव तालुक्यात डिस्कळ, पुसेसावळी, कातरखटाव, निमसोड, मायणी. माण तालुक्यात मार्डी, मलवडी, पुळकोटी, शिंगणापूर. महाबळेश्वर तालुक्यात तापोळा, तळदेव. खंडाळा तालुक्यात शिरवळ, लोणंद. पाटण तालुक्यात मरळी, मोरगिरी, केरळ, मरुड, सळवे, तारळे, चाफळ, काळगांव, सोनावडे. कोरेगांव तालुक्यात रहिमतपूर, वाठार स्टेशन, पळशी, सातारारोड, तडवळे. सातारा तालुक्यात कुमठे, कण्हेर, नागठाणे, नांदगांव, ठोसेघर. फलटण तालुक्यात बिबी, राजाळे. वाई तालुक्यात भुईंज, बावधन व कवठे इत्यादी प्राथमिक आरोग्य केंद्रांची निवड करणेत आली आहे.सदर 49 स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी एकुण 4139.17 लक्ष (41 कोटी 39 लक्ष 17 हजार) निधीची आवश्यकता असून, त्यापैकी जिल्हा नियोजन समितीकडून 1943.58 लक्ष (19 कोटी, 43 लक्ष 58 हजार) निधी मंजूर करण्यात आलेला आहे.
सदर कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील पवारवाडी ता.फलटण, निनाम ता.सातारा, एकंबे ता.कोरेगांव व मारुल हवेली ता.पाटण या नवीन 4 प्राथमिक आरोग्य केंद्राचे ई-भुमिपूजन होणार आहे. सदर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या बांधकामासाठी रक्कम रुपये 5200.00 लक्ष (52 कोटी) रकमेस प्रशासकीय मंजूरी व कार्यारंभ आदेश देण्यात आलेले आहेत.
नविन प्राथमिक आरोग्य केंद्र ताथवडा, गुरसाळे, क्षेत्र माहुली, अंगापूर व येळगांव या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद यांच्या वतीने नव्याने 6 रुग्णवाहीकांचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे.
आय केअर (II Care Foundation Baramati) स्वयंसेवी संस्था बारामती यांचे मार्फत सातारा जिल्हयातील प्राथमिक आरोग्य केंद्रा करीता 125 संगणक मोफत पुरवण्यात आले आहेत.सदर संगणकांचे प्राथमिक आरोग्य केंद्रांना वाटपाचा कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थित पार पडणार आहे.
जिल्ह्यातील स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रांचा शुभारंभ, नूतन प्राथमिक आरोग्य केद्रांचा ई-भूमिपूजन कार्यक्रम रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा व संगणक वितरणाचा कार्यक्रम मा.मुख्यमंत्री महोदय व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक 3 जानेवारी 2024 रोजी संपन्न होत आहे, तरी सदर कार्यक्रमास जिल्ह्यातील नागरीकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषद यांचेमार्फत करण्यात येत आहे.
– ज्ञानेश्वर खिलारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प.सातारा













