थकबाकीदार, माजी संचालकांना ‘वाई अर्बन’ चा दणका… ठकसेनांवर गुन्हे दाखल – कर्ज वसुलीला वेग : चेअरमन अनिल देव यांची पत्रकार परिषदेत माहिती
![]()
बँकेचे मा. संचालक मंडळाचा गेल्या पाच महिन्यांतील कामकाजाचा आढावा.
बँकेच्या नूतन संचालक मंडळाने माननीय अध्यक्ष श्री. अनिल मोरेश्वर देव, उपाध्यक्ष डाँ. श्री. शेखर बाळकृष्ण कांबळे व मान्यवर संचालक मंडळ सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 21 जून, 2023 रोजी बँकेचा कार्यभार हाती घेतला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात असलेली एनपीए रक्कम वसूल करण्याचे आव्हान मा. संचालक मंडळापुढे होते. ते आव्हान पेलताना गेल्या पाच महिन्यांत बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाला चांगले यश मिळत आहे.
गेल्या 5 महिन्यांच्या कालावधीत थकीत कर्जदारांकडील रू. 115 कोटींहून अधिक रकमेची थकीत कर्ज वसुली व एनपीए खात्यांची वसुली बँकेने केली आहे. त्यापैकी 215 एनपीए खातेदारांकडील जवळपास 50 ते 52 कोटी रूपयांची निव्वळ एनपीए थकीत रक्कम वसूल करण्यात बँकेला यश आले आहे. अद्यापही अनेक खात्यांवर कारवाई सुरू असून 31 मार्च, 2024 अखेर जास्तीत जास्त थकीत कर्ज खाती नियमित करण्याचा मा. संचालक मंडळाचा प्रयत्न आहे.
अनेक खात्यांमध्ये वसुलीला अडचणी येत आहेत. परंतु बँकेचे संचालक, सर्व अधिकारी व कर्मचारी वेगवेगळ्या कायदेशीर मार्गाने कर्जदारांकडून थकीत कर्ज वसूल करीत आहेत. मार्च 2024 अखेर आणखी किमान 50 ते 60 कोटी रूपये वसूल करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. बँकेचे सर्वात मोठे मालतारण कर्जापैकी अनेक खातेदारांच्या हळद व अन्य मालतारणाची लिलाव प्रक्रिया सुरू असून त्याव्दारे बँकेचे कोट्यावधी रूपये एनपीए खात्यात वसुली होत आहे. त्यामुळे जवळपास थकीत कर्जामध्ये 115 कोटी रूपये व निव्वळ एनपीएमध्ये 52 कोटी रूपये इतकी रक्कम नवीन संचालक मंडळाने गेल्या 5 महिन्यांच्या कालावधीत वसूल केली आहे.
शासनाच्या सहकार विभागाचे जिल्हा उपनिबंधक श्री. मनोहर माळी, पालक अधिकारी सहाय्यक निबंधक जनार्दन शिंदे व सर्व अधिकारी बँकेला चांगले सहकार्य करीत आहेत. त्यांच्या माध्यमांतून चांगल्या प्रकारची कर्ज वसुली होत आहे.
ज्या कर्जदारांनी प्लाँट, फ्लॅट तारण ठेवून कर्जे घेतली आहेत. त्यांच्या मालमत्ता विकून त्वरीत थकीत कर्जाची रक्कम वसूल केली जात आहे. आगामी 3 ते 4 महिन्यांत मोठ्या प्रमाणांत कर्ज वसुलीचे उद्दिष्ट असून कोणत्याही परिस्थितीत बँकेचा नेट एनपीए कमी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. हे काम निश्चितच अवघड आहे पण अशक्य नाही. यासाठी बँकेबरोबर सर्व संबंधित थकबाकीदारांनी आपापली कर्ज थकबाकी भरून सहकार्य करणे, आवश्यक आहे.
दि. 21 जून, 2023 पासून नवीन संचालक मंडळाने सुरू केलेल्या योजना- लो काँस्ट डिपॉझिट वाढीसाठी क्यू आर कोड-
व्यापारी व व्यावसायिकांसाठी दि. 10 नोव्हेंबर, 2023 पासून गेट पे कंपनीच्या माध्यमांतून सेव्हींग्ज खाते, करंट खाते व कॅश क्रेडीट खात्यांसाठी क्यू आर कोड सुविधा सुरू केली आहे. त्याव्दारे व्यापारी, व्यावसायिक यांना त्यांचे व्यवसायातून मिळणा-या रकमा थेट आपल्या बँकेच्या खात्यात येण्याची सुविधा निर्माण झाली आहे. त्यामुळे बँकेच्या कासा डिपॉझिटमध्येही वाढ होत आहे. व्यापा-यांना ही सुविधा वापरण्या योग्य सोपी असून अनेक लोक या क्यू आर कोडच्या सुविधेचा फायदा घेत आहेत. गेल्या महिनाभरात 200 हून अधिक बँक ग्राहकांना याचा फायदा करून दिला आहे.
बँक व्यवसाय वाढीसाठी एलआयसी कंपनी सोबत सामंजस्य करार
बँकेने दि. 05 डिसेंबर, 2023 भारतीय जीवन बिमा निगम (एलआयसी) सोबत व्यवसायवृध्दीसाठी करार केला आहे. त्यानुसार एलआयसीच्या पॉलीसीज आपल्या बँकेच्या ग्राहकांना उपलब्ध करून देता येणार आहेत. तसेच एलआयसी संबंधित जुन्या पॉलिसींवर त्यांच्या सरेंडर व्हॅल्यूवर आधारित कर्ज देण्याची व्यवस्था आपल्या बँकेकडे उपलब्ध आहे. त्याचाही फायदा ग्राहकांना होत आहे.
त्यानुसार एलआयसीच्या नवीन व जुन्या स्कीमच्या पॉलिसीज, जीवन सुरक्षा विमा, सुरक्षित आयुष्य विमा योजना आदी विविध योजनांचे मार्केटिंग बँकेच्या वतीने करण्यात येणार आहे.
थकीत कर्जदार व बँकेची फसवणूक केलेले कर्जदार यांच्यावर पोलीस कारवाईचा धडाका सुरू केला असून बँकेच्या मागील संचालक मंडळातील उपाध्यक्ष श्री. राजेंद्र चावलानी, तज्ञ संचालक सीए. किशोरकुमार मांढरे यांच्या विरोधात सुध्दा वाई व पुणे येथील विविध पोलीस ठाण्यांत फसवणुकीच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. त्याची सविस्तर माहिती सोबत जोडली आहे.
वाई अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष श्री. राजेंद्र खिअलकुमार चावलानी, माजी तज्ञ संचालक सीए श्री. किशोरकुमार नामदेवराव मांढरे तसेच वाईतील बांधकाम व्यावसायिक श्री. नितीन सुभेदार जगताप व इतर ११ जणांवर बँकेतर्फे फसवणूक करणे, खोटे व बनावट कागदपत्रे सादर करणे, आर्थिक फसवणूक करणे, बनाव रचून खोटे व्यवहार दाखविणे, कट कारस्थान करणे, पदाचा गैरवापर करणे, बँकेचे कर्मचारी यांचेवर दबाव टाकणे या कलमाअंतर्गत वाई पोलीस ठाणे व अलंकार पोलीस स्टेशन पुणे, गणेश नगर, एरंडवणे, पुणे, खडकमाळ पोलीस ठाणे, शुक्रवार पेठ पुणे, येथे तक्रार अर्ज (FIR) दाखल केलेले आहेत, अशी माहिती वाई अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद कुलकर्णी व अध्यक्ष श्री अनिल मोरेश्वर देव यांनी दिली.
वाई अर्बन बँकेच्या वैधानिक लेखापरीक्षक यांनी त्यांचे अहवालानुसार गैरव्यवहार झालेल्या कर्जखात्यांवर कारवाई करणेबाबत लेखी दिले होते, वाई अर्बन बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी व पत्नी भारती चावलानी, वाईतील बांधकाम व्यवसायिक श्री नितीन जगताप व इतर अन्य ६ यांचेवर भारतीय दंड संहितेचे कलम ४०६, ४०९,४२० व ३४ अंतर्गत फौजदारी स्वरूपाचा ब्रीच ऑफ ट्रस्ट, फसवणूक, खोटे व बनावट कागदपत्रे सादर करणे, आर्थिक फसवणूक करणे, बनाव रचून खोटे व्यवहार दाखविणे, कट कारस्थान करणे, पदाचा गैरवापर करणे, बँकेचे कर्मचारी यांचेवर दबाव टाकणे अशी तक्रार वाई अर्बन बँकेतर्फे वाई पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आली आहे. तसेच यामध्ये कर्जदार १) श्री कुमार हनुमंत चौधरी २) श्री विनायक बाबुराव जगताप ३) श्री हेमंत विजयराव कदम ४) श्री योगेश बबन सुतार ५) श्री अनिल सदाशिव ननावरे ६) श्री नितीन हनुमंत चिकणे यांनी कर्जाच्या रक्कमा जामीनदार श्री नितीन जगताप यांच्या ज्योती कन्स्ट्रकशन या नावाने कर्जदारांच्या संमतीने जमा केली.
यामध्ये कर्जदारांनी बँकेची पूर्वपरवानगी अथवा संमती न घेता बँकेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने तारण मिळकतीची विक्री केली आहे. यातील प्लॉट नं. २७/२ब/१ याची विक्री दि. ०१/०७/२०१७ रोजी नितीन जगताप यांनी विजयसिंह बळीराम जाधव यांना केलेली आहे. दि. ०३/११/२०१७ रोजी बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी व पत्नी भारती राजेंद्र चावलानी यांना श्री नितीन सुभेदार जगताप यांनी विकला आहे. या काळात श्री चावलानी हे बँकेचे उपाध्यक्ष होते त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून हा व्यवहार स्वार्थी हेतूने व जाणीवपूर्वक केलेला आहे. बांधकाम व्यावसायिक श्री नितीन जगताप हे वरील ६ कर्जाना जामीनदार आहेत व त्यांचीच मिळकत वरील ६ कर्जदारांना तारण दिलेली होती व आहे. वरील सर्व व्यवहार बेकायदेशीररित्या सर्वांनी संगनमत करून बँकेचे आर्थिक नुकसान व फसवणूक केलेली आहे. वरील तक्रार अर्ज अॅड. प्रमोद थिटे यांनी बँकेच्या वतीने दाखल केलेला आहे.
वाई अर्बन बँकेचे मागील संचालक मंडळातील तज्ञ संचालक सीए किशोरकुमार मांढरे व इतर अन्य ४ थकीत कर्जदारांवर यांचेवर भारतीय दंड संहितेचे कलम १२० बी, ४०६, ४२०,४६३,४६४,४६७, ४६८, ४७१ अंतर्गत फौजदारी स्वरूपाचा ब्रीच ऑफ ट्रस्ट, फसवणूक, खोटे व बनावट कागदपत्रे सादर करणे, आर्थिक फसवणूक करणे, बनाव रचून खोटे व्यवहार दाखविणे, कट कारस्थान करणे, पदाचा गैरवापर करणे, बँकेचे कर्मचारी यांचेवर दबाव टाकणे अशी तक्रार वाई अर्बन बँकेतर्फे अलंकार पोलीस स्टेशन पुणे, गणेश नगर, एरंडवणे, पुणे व खडकमाळ पोलीस ठाणे, शुक्रवार पेठ पुणे, येथे दाखल करण्यात आली आहे. वरील तक्रार अर्ज अॅड. आदित्य श्रीराम भट यांनी बँकेच्या वतीने दाखल केलेले आहे. बँकेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र चावलानी व पत्नी भारती चावलानी, बांधकाम व्यवसायिक नितीन जगताप व इतर अन्य ६ तसेच बँकेचे माजी तज्ञ संचालक सीए, किशोरकुमार मांढरे व इतर अन्य ४ कर्जदारांनी बँकेची केलेल्या फसवणुकीमुळे वाई शहरात खळबळ उडाली आहे. बँकेच्या या कारवाईमुळे कर्ज वसुलीसाठी त्याची मदत होणार आहे. अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीपाद व्यंकटेश कुलकर्णी व अध्यक्ष अनिल देव व इतर संचालक यांनी दिली.













