सेवाभावी वृत्तीची शिकवण श्रमसंस्कारांतूनच मिळते – पोलिस उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांचे प्रतिपादन
देगाव / प्रतिनिधी : वर्षा इथापे
सामाजिक बांधिलकीची भावना व सेवाभावी वृत्तीची शिकवण जीवनात खऱ्या अर्थाने श्रमसंस्कार शिबिरातूनच प्राप्त होते, असे मत भुईंज पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक रत्नदीप भंडारे यांनी व्यक्त केले. देगाव (ता. वाई) येथे गौरीशंकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च लिंब या महाविद्यालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे, (रायगड) अंतर्गत दि. 20 नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर पर्यंत आयोजित केलेल्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी, उपप्राचार्य डॉ. योगेश गुरव, विभाग प्रमुख डॉ. संतोष बेल्हेकर, प्रबंधक निलेश पाटील, कार्यक्रम अधिकारी रोहन खुटाळे, देगावचे सरपंच सूरज पिसाळ, उपसरपंच प्रकाश इथापे, किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास इथापे, ग्रामसेवक नेताजी काळभोर, सचिन इथापे, विजयराव इथापे, पोलीस पाटील राजेंद्र चव्हाण, शंकर इथापे, नीलेश पंडित, सयाजी थोपटे पांडुरंग इथापे, संजय इथापे, गणपत इथापे तसेच देगाव ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदींची प्रमुख उपस्थित होते.
उद्घाटनपर भाषणात रत्नदीप भंडारे पुढे म्हणाले की, शिक्षणाबरोबरच व्यवहार ज्ञानाचे शिक्षण हे केवळ श्रमसंस्कारातूनच मिळते, श्रमाचे मोल जीवनात अनमोल असून सांघिक भावना व संवेदनशीलतेची जाणीव श्रम संस्कारातून प्राप्त होते.
किसन वीर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामदास इथापे म्हणाले की, यशस्वी जीवन घडविण्यासाठी जीवनात श्रम व संस्काराची कास धरणे आवश्यक आहे. जग बदलत आहे पण आपल्या पूर्वजांनी दिलेली संस्काराची व श्रमाची जपणूक करणे आपले कर्तव्य आहे. प्राचार्य डॉ. अजित कुलकर्णी म्हणाले की, श्रमाचे महत्त्व व त्याची उपयुक्तता याचे मोल अनमोल आहे. संस्कार रुपी समाज निर्मितीसाठी श्रमसंस्कार शिबिरे होणे गरजेचे आहे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यातूनच सामाजिकतेचे बीजारोपण करणे आवश्यक आहे.
जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर म्हणाले की, विज्ञान तंत्रज्ञानाने जग झपाट्याने बदलत आहे पण माणसामाणसातील सुसंवादाचे नाते हे लुप्त होत आहे. संवेदनशील विचाराने आज एकत्र येणे खरी गरज आहे. वैचारिक बैठक संपन्न करण्यासाठी सुसंस्काराचे व्यासपीठ विद्यार्थ्यांना उपलब्ध झाले पाहिजे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदित्य कोल्हे व अश्विनी निकम यांनी केले.
देगावमध्ये विविध सामाजिक उपक्रम –
पाच दिवसीय विशेष श्रमसंस्कार शिबिरामध्ये विद्यार्थ्यांना देगाव येथे ग्रामस्वच्छता अभियान, वृक्ष लागवड, सामाजिक ऐक्य व एकात्मता विषयी परिसंवाद, अंधश्रद्धा निर्मूलन व प्रबोधन, आरोग्य विषयक मार्गदर्शन, रक्तगट तपासणी, साक्षरता अभियान, जलसंधारणाचे महत्त्व या विषयाचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी, प्रा. स्वप्नाली झोरे, प्रा. गौरी इथापे, प्रा. स्नेहल सावंत, प्रा. शुभम चव्हाण, विजय निकम आदी परिश्रम घेत आहेत.













