मराठा आरक्षण प्रश्नाच्या बंदला जिल्ह्यात शंभर टक्के प्रतिसाद
![]()
वाई तालुका मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने आज वाई शहरातून हजारोच्या संख्येने मशाल मोर्चा, गोंदवलेत बस फोडली, मार्डीत मुंडन, तर दहिवडीत परीक्षेचा पेपर देण्यास विद्यार्थ्यांचा नकार, म्हसवड येथे कॅण्डल मोर्चा काढून आंदोलनास पाठिंबा
सातारा / प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रश्नावरून सध्या संपूर्ण राज्यातील वातावरण चांगलेच तापले असून मनोज जरांगे यांनी घेतलेल्या भूमिकेला पाठिंबा देण्यासाठी मंगळवारी संपूर्ण सातारा जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.
उत्स्फूर्तपणे सर्व उद्योग, व्यवसाय बंद ठेवून बंदला 100% पाठिंबा देण्यात आला.
बंदला मान तालुक्यात काहीसे हिंसक वळण लागले गोंदवले बुद्रुक येथे एका बसची काच फोडण्यात आली, तर मार्डी येथे सामूहिक मुंडन करण्यात येऊन शासनाच्या धोरणाचा निषेध करण्यात आला, तसेच दहिवडी येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसेल तर आम्ही परीक्षेचा पेपर देणार नाही अशी भूमिका घेतली.
दरम्यान सातारा शहरासह जिल्ह्यात सर्वच लहान मोठ्या गावांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. साताऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंदोलनस्थळी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी भेट दिली व समाज बांधवांना मार्गदर्शन केले. सामाजिक शांततेचा भंग होणार नाही, याची काळजी घेऊन आंदोलन करावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.
दरम्यान वाईमध्ये वाई तालुका मराठा क्रांती मोर्चातर्फे हजारोंच्या सहभागातून मशाल मोर्चा काढण्यात आला.
मराठा आरक्षणावरून सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता आता चांगलीच वाढू लागली असून तालुक्यातील सकल मराठा समाज आजच्या विशाल मशाल मोर्चात सहभागी झाला होता.
याशिवाय वाई तालुक्यात समाज बांधवांचे साखळी उपोषणही सुरू असून विविध प्रकारे आंदोलक आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचवत आहेत. वाई शहरातून आज काढण्यात आलेल्या मशाल मोर्चा तालुक्यातील सर्व गावांमधून हजारोंच्या संख्येने आबाल वृद्ध सहभागी झाले होते.
मंगळवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास कृष्णा नदीच्या तीरावर महागणपती मंदिर येथे महाआरती करून मोर्चास सुरुवात झाली.
महागणपती मंदिर- गंगापुरी – वाई नगरपरिषद – जैन मंदिर – रविवार पेठ – चावडी चौक – वाई हायस्कूल – किसन वीर चौक – कृष्णा नदीवरील नवीन मोठा पूल- पोस्ट ऑफिसमार्गे हा मोर्चा साखळी उपोषणाच्या ठिकाणी पोचला. जोरदार घोषणाबाजी करत समाजबांधवांनी आपल्या मागण्या मांडल्या. उपविभागीय पोलिस अधिकारी बाळासाहेब भालचीम, पोलिस निरिक्षक बाळासाहेब भरणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.













