किसनवीर-खंडाळा साखर उद्योगाचा सोमवारी गळित हंगाम शुभारंभ
दि. २८, वाई :
किसन वीर – खंडाळा सहकारी साखर उद्योगाच्या सन २०२३-२४
च्या गळित हंगामाचा शुभारंभ सोमवार (दि. ३०) दुपारी १ वाजता विधानपरिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या शुभहस्ते व किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.
याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, शासनाने साखर कारखाने १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार किसन वीर व किसन वीर- खंडाळा हे दोन्ही कारखाने आपण १ नोव्हेंबरला गाळपास सुरूवात करणार आहोत. दोन्ही कारखान्याकडे आवश्यक असणारी तोडणी यंत्रणा कार्यस्थळावर दाखल झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाची तोड नियमाप्रमाणे व वेळेवर होणार आहे. शेतकऱ्यांनीही आपला संपुर्ण परिपक्व झालेला ऊस दोन्ही कारखान्यांना गाळपासाठी देण्याबाबत आवाहनही यावेळी श्री. शिंदे यांनी पत्रकात म्हटले आहे.
या गळित हंगाम शुभारंभास किसन वीर व खंडाळा कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक, पदाधिकारी व कार्यकर्त्यानी बहुसंख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन खंडाळा कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, उपाध्यक्ष राजेंद्र तांबे, किसन वीरचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे व दोन्ही कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.













