सातारा जिल्हा बँक साडे सात दशकाच्या यशस्वी सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल ए बी पी माझा कडून अनमोल रत्न पुरस्काराने सन्मानित !
एबीपी माझा वृत्तसमूहाची २४ तास मराठी बातम्या देणाऱ्या वृत्तवाहिनी कडून सातारा जिल्हा बँक तसेच बँकेचे अध्यक्ष मा. श्री. नितीन पाटील आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे यांना “अनमोल रत्न” पुरस्कार देऊन गौरविणेत आले. बँकेच्या गत साडेसात दशकातील एकूणच सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल एबीपी माझा कडून बँकेचा सन्मान करणेत आला आहे.
बँकेच्या दैदिप्यमान कामगिरीचा आढावा आणि बँकेचा झालेला सन्मान एबीपी माझा चनेल वर उद्या वार रविवार दिनांक २९/१०/२०२३ रोजी दुपारी ०३.३० वाजता प्रसारित होणार आहे. या प्रसारणाचा लाभ बँकेच्या सर्व ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष मा. श्री. नितीन पाटील यांनी केले आहे.
सातारा जिल्हा बँक जिल्ह्याच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका निभावत आहे. बँकेचे कामकाज देशात आदर्शवत आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्हयाची अर्थवाहिनी असून, ग्रामीण व शहरी जनतेचा आर्थिक स्तर उंचावण्याचा तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे जलद सेवा पुरविणेचा सातत्याने प्रयत्न करीत आहे. नाबार्डकडून सलग सहा वर्षे राष्ट्रीय पातळीवरील सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार आणि जिल्ह्यातील कृषि व ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या विकासामधील महत्वपूर्ण योगदानासाठी नाबार्डने सर्वांगीण कामकाजाची दखल घेवून बेस्ट बँक परफॉरमन्स म्हणून ‘विशेष स्मृती पुरस्कार २०२१’ ने बँकेस सन्मानित केले.
या पुरस्काराबद्दल श्री. नितीन पाटील म्हणाले, समाज परिवर्तन करणेसाठी शेतकरी आर्थिक- दृष्ट्या सक्षम करणे, त्याची सावकारी पाशातून मुक्तता करणे, शेतकऱ्यांना सहजतेने आणि गरजेनुसार माफक व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत जिल्हयाचा कृषि व ग्रामीण विकास साधणेचे उदात्त हेतूने, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची स्थापना देशाचे प्रज्ञावंत नेतृत्व आणि जिल्ह्याचे सुपूत्र यशवंतरावजी चव्हाण आणि समकालीन समाज धुरिणांनी दि.१५ ऑगस्ट १९४९ रोजी केली. तळमळीने, निष्ठेने आणि ध्येयवादाने कार्यरत राहत, स्वतंत्र प्रज्ञेने, संघटन शक्तीने आणि परस्पर सहकार्य भावनेने कार्यरत राहून यशवंतरावजी चव्हाण साहेबांबरोबर बाळासाहेब देसाई, रघुनाथराव पाटील, आबासाहेब वीर इ .अनेक द्रष्ट्या मान्यवरांच्या अथक प्रयत्नामधून या बँकेची स्थापना झाली.
बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. अनिल देसाई म्हणाले, सहकारी बँकांचे देशाच्या ग्रामीण विकासात फार मोठे योगदान आहे. आदर्शवत व उज्वल परंपरा, पारदर्शक कारभार तसेच उत्कृष्ट कार्यप्रणाली यामुळे बँकेची ख्याती राज्याबरोबरच देशातही झाली आहे. मा. संचालक मंडळाने आखून दिलेली ध्येय-धोरणे व त्यांची प्रभावी अंमलबजावणी, जिल्हयातील सर्वसामान्य शेतक-यांची बँकेवर असलेली अढळ निष्ठा, आर्थिक शिस्त, विकास संस्था, सर्व सभासद संस्था, ग्राहक, कर्जदार, हितचिंतक यांच्या सदिच्छा यामुळेच बँक प्रगतीपथावर पोहोचली आहे .
बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे म्हणाले, दिनांक १५ ऑगस्ट २०२३ रोजी बँकेने अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. या बँकेच्या सुवर्ण कालखंडात सतशील, विचारशील, कार्यशील आणि गतीशील नेतृत्वांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने अत्यंत नेत्रदीपक आर्थिक प्रगतीने विशेष मानदंड निर्माण करत देशाच्या बँकिंग क्षेत्रात अग्रस्थान प्राप्त केले आहे.
बँकेच्या यशामध्ये बँकेचे नेतृत्व केलेल्या विलासराव पाटील (उंडाळकर), केशवराव पाटील श्रीमंत छ. अभयसिंहराजे भोसले, लक्ष्मणराव पाटील, भि. दा. भिलारे ( गुरुजी), बकाजीराव पाटील, सुरेश वीर, दादाराजे खर्डेकर, विलासराव पाटील (वाठारकर), सदाशिवराव पोळ या मान्यवरांचे मोलाचे योगदान आहे. बँकेचे जेष्ठ संचालक व विधान परिषदेचे माजी सभापती मा. आ. रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व माजी सहकार व पणन मंत्री मा. आ. बाळासाहेब पाटील, संचालक मा. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, संचालक मा. आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. आ. मकरंद पाटील, बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. अनिल देसाई तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली बँकेची यशस्वी वाटचाल सुरु आहे.
या पुरस्काराबद्दल बँकेचे जेष्ठ संचालक व विधानपरिषदेचे माजी सभापती मा. आ. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संचालक व महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री मा. आ. श्री. बाळासाहेब पाटील, संचालक व मा. खा. श्रीमंत छ. उदयनराजे भोसले, संचालक मा. आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, मा. आ. मकरंद पाटील तसेच बँकेचे सर्व संचालक मंडळ, बँकेचे ग्राहक, ठेवीदार, कर्जदार, हितचिंतक, गट सचिव व मान्यवरांनी अभिनंदन केले.













