शिवाजी पार्कवरील दुर्गोत्सवातील सभामंडपाचे शिल्प साकारताहेत वाईचे नीलेश चौधरी
मुंबईच्या शिवाजी पार्क येथे यंदा सलग 80 वां दुर्गोत्सव संपन्न होत असून त्याची जय्यत तयारी ‘बंगाल क्लब’ तर्फे सुरू आहे.
‘दिव्य ज्योती’ संकल्पनेवर आधारित यंदाच्या सजावटीचा सभामंडप वाई तालुक्याचे सुपुत्र व उदयोन्मुख कलादिग्दर्शक निलेश चौधरी हे साकारत आहेत.
अंदाजे १० लाख भाविक या उत्सवात यंदा सहभागी होणार असून सातारा जिल्ह्यातील युवा कलादिग्दर्शकांनी पेलेल्या या शिवधनुष्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बंगाल क्लब तर्फे प्रतिवर्षाच्या परंपरेनुसार यंदाही दुर्गा उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाच्या वर्षी २० ते २४ ऑक्टोबर या कालावधीत दिव्य ज्योत आणि आरसा महलच्या संकल्पनेसह भव्य सभामंडप उजळून निघणार आहे. यासोबतच यंदाच्या वर्षीची मुंबईतील सर्वांत उंच देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येईल. मूर्तीची उंची १९ फूट इतकी असेल. या उत्सवादरम्यान बंगालची संस्कृती आणि कलेची अनुभूती घेता येणार आहे.
दररोज पारंपरिक नृत्य आणि विजया दशमीच्या दिवशी सिंदूर उत्सव मोठ्या थाटात साजरा होणार आहे. यंदा 80 व्या वर्षी साजरा होत असलेल्या दुर्गा उत्सवाच्या निमित्ताने आकर्षक आणि भव्य असा सभामंडप कल्पकतेने साकारला जाणार आहे.
दरवर्षी नितीन देसाई हा सभामंडप साकारत असत ; मात्र त्यांच्या निधनानंतर यंदा नीलेश चौधरी यांनी हा सभामंडप साकारण्याची जबाबदारी स्वीकारली.
त्याच वेळी यंदाच्या वर्षी ‘दिव्य ज्योती मंदिर’ या संकल्पनेसह ५०१ दिव्यांनी संपूर्ण मंडप सजवण्यात येणार आहे. विजेवरील दिव्यांचा वापर सजावटीसाठी करण्यात येणार आहे. सभामंडप संपूर्ण आरसा महलने सजवण्यात येणार आहे.
सभामंडपात देवीसमोर ५१ दिव्यांची रोषणाई असेल. मंडपाच्या मुख्य प्रवेशद्वारावर दोन भव्य हत्तींच्या प्रतिकृती उभारण्यात येतील. तसेच प्रवेशद्वार ते सभामंडप २५ झुंबर लावले जातील.
हा मंडप उभारण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी लागला असून सध्या या सभामंडपाच्या उभारणीची हातघाई अंतिम टप्प्यात येवून ठेपली आहे. वाई तालुक्यातील शेलारवाडी हे मुळगाव असलेल्या निलेश चौधरी यांनी आजवर अनेक उत्तमोत्तम सजावटीतून आपल्या कलेला वाव दिला आहे. पसरणी या मामाच्या गावी शिक्षण घेतल्यानंतर निलेश चौधरी यांनी कलाक्षेत्रात घेतलेली भरारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
उत्सवादरम्यान अनेक कला, सांस्कृतिक आणि इतर स्पर्धा-प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. तसेच उत्सवादरम्यान अवयवदानाचा संदेश देण्यात येणार आहे. या वेळी अवयवदान मोहिमेत सहभाग घेत शपथ घेण्यात येईल.
नवरात्रीतील पहिल्या दोन ते तीन दिवसांत मुखदर्शन सोहळा पार पडणार आहे. बंगाल क्लब सामाजिक, सांस्कृतिक, परोपकारी आणि क्रीडा उपक्रमात नेहमीच अग्रेसर राहिला आहे. या सर्व गोष्टी डोळ्यासमोर ठेवून आम्ही दरवर्षी समाजातील विविध स्तरांतील लोकांना सहभागी करून घेतो.
आठ दशकांची समृद्ध कला संस्कृती व अध्यात्माची परंपरा असलेल्या दुर्गा उत्सवाची सभा मंडपाची सजावट करण्याचा बहुमान सातारा जिल्ह्याचे सुपुत्र असलेल्या निलेश चौधरी यांना मिळाल्याने वाई तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यातून समाधान व्यक्त होत आहे.
गंगेकाठच्या मातीतून मूर्ती पर्यावरणपूरकतेचे भान राखत यंदा मूर्तीसह पूजा मंडप पारंपरिक पद्धतीने बनवण्यात येणार आहे. यासाठी गंगा नदीच्या काठावरील मातीचा वापर केला जाणार आहे.













