Thu, Jan 15, 2026
प्रशासन सातारा जिल्हा

माझी माती – माझा देश अंतर्गत ‘अमृत कलश यात्रा’ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम – पालकमंत्री शंभूराज देसाई

माझी माती – माझा देश अंतर्गत ‘अमृत कलश यात्रा’  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम – पालकमंत्री शंभूराज देसाई
Ashok Ithape
  • PublishedOctober 16, 2023

सातारा दि. 16 (जि.मा.का.) –

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी माझी माती – माझा देश या संकल्पनेतून संपूर्ण देश एकत्र करण्याचे काम केल्याचे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले. सातारा शहरातील पोवई नाका येथे शिवतिर्थावर माझी माती – माझा देश अंतर्गत अमृत कलशांचे पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते मुंबई येथे जाण्यासाठी स्वयंसेवकांकडे सुपुर्त करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधिक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे यांच्यासह सर्व गटविकास अधिकारी, विभाग प्रमुख, स्वयंसेवक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण देशात माझी माती – माझा देश कार्यक्रम राबवण्यात येत असल्याचे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शहिदांना, विरांना, जवांनांना अभिवादन करून देशपातळीवरील एक अतिउच्च स्मारक दिल्लीमध्ये तयार होत आहे, त्याठिकाणी ही आपल्या प्रत्येक गावातील, देशभरातील माती समर्पित करणार आहोत. प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिलेला हा एक स्तुत्य उपक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह संपूर्ण मंत्रीमंडळाने मिळून राज्यभर साजरा केला. आज हा जिल्ह्याचा कलश मुंबई येथे जाईल व तेथून तो नवी दिल्लीला जाईल. माझी माती – माझा देश या संकल्पनेतून प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी देशातील सर्व घटकांना, जाती धर्मातील लोक, अबाल वृद्ध, सर्व वयोगटातील लोक, महिला यांना एकत्र  करण्याचे काम केले आहे. त्याला आपल्या जिल्ह्यासह संपूर्ण राज्यातून मोठा प्रतिसाद मिळाला. या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या सर्व शासकीय अधिकारी, विभाग, सर्व नागरिक, ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त करतो व या उपक्रमास शुभेच्छा व्यक्त करतो असेही ते म्हणाले.

             शिवतीर्थ येथे आयोजित कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून आणलेले अमृत कलश मुंबईकडे घेऊन जाण्यासाठी स्वयंसेवकांना पालकमंत्री श्री. देसाई यांनी सुपुर्त केले. या अमृत कलशांमध्ये तालुक्यांमधील प्रत्येक गावांमधील माती आणि तांदूळ जमा करण्यात आले आहेत. यावेळी उपस्थितांनी पंचप्रण शपथ घेतली. तसेच अफजलखानाचा वध हा पोवाडा सादर करण्यात आला.

            सुरुवातीस जिल्हा परिषदेच्या आवारामध्ये तालुकास्तरावरून आणलेल्या अमृत कलशांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर पोवाडा गायन, गजी नृत्य सादरीकरण झाले. गटविकास अधिकारी यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांच्याकडे अमृत कलश सुपुर्त केले. तसेच जिल्हा परिषद ते पोवई नाका अशी अमृत कलश यात्रा पार पडली. शेवटी जिल्हाधिकारी कार्यालयात या यात्रेचा समारोप करण्यात आला.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!