बोंडारवाडीच्या प्रणवीचा विश्वविक्रम ९६ तास स्केटिंग, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये कामगिरीची नोंद
पाचगणी / प्रतिनिधी :
जावळी तालुक्यातील बोंडारवाडी येथील प्रणवी प्रकाश डोईफोडे हिने बेळगावमधील स्केट्स मोटो फॉर्मशनमध्ये सलग ९६ तास स्केटिंग करून विश्वविक्रम केला. तिच्या या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्यात आली आहे. तर तिच्या या यशामुळे महाबळेश्वरबरोबरच सातारा जिल्ह्याचे नाव उंचावले आहे.
बेळगाव येथे नुकत्याच पार पडलेल्या रोलर स्केटिंग क्लब स्पर्धेत सलग ९६ तास स्केट्स मोटो फॉर्मशनचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेमध्ये देशभरातून ४९० मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये कात्रज-कोंढवा रोड येथील रॉक ऑन व्हील्स स्केटिंग अकॅडमीच्या २५ खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
या खेळांडूमध्ये प्रणवीचा समावेश होता. या स्पर्धेत चार वर्षांपासून ते चौदा वर्षे वयाचे खेळाडू सहभागी झाले होते. या खेळाडूंनी सलग ९६ तास स्केटिंग करून एक नवा विश्वविक्रम केला. या विक्रमासाठी प्रमुख पंचांमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजय मलजी यांची निवड करण्यात आली होती.













