पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांना आबासाहेब वीर पुरस्कार जाहीर : प्रमोद शिंदे
![]()
६ सप्टेंबरला होणार पुरस्कार वितरण समारंभ
भुईंज / प्रतिनिधी दि. ४ सप्टेंबर
देश-विदेशात शिक्षण आणि वैद्यकीय संस्था, तसेच नवी मुंबईतील खेळाचे भव्य मैदान असो, ज्या क्षेत्रात पाऊल ठेवलं, तिथे सर्व ठिकाणी ठोस कामगिरी करत आपल्या कामानं आपल्या नावाचं साम्राज्य तयार केलं असे बिहार, त्रिपुराचे माजी राज्यपाल, ज्येष्ठ नेते डॉ. डी. वाय पाटील यांना यंदाचा ‘आबासाहेब वीर सामाजिक पुरस्कार’ देण्यात येणार असल्याची माहिती, किसन वीर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी दिली.
शिंदे पुढे म्हणाले, की या पुरस्काराची सुरूवात १९९६ साली झालेली असून यंदाचे २७ वे वर्षे आहे. कोल्हापूर येथे जन्म झालेले डॉ. डी. वाय. पाटील हे आपणांसर्वांना परिचित असून त्यांचे मुळ नाव ज्ञानदेव यशवंतराव पाटील हे आहे. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून सुरु केलेली राजकीय कारकीर्द पुढे अनेक मोठमोठ्या पदांपर्यंत घेऊन गेली. कार्यकर्ता, महापौर, आमदार ते अगदी राज्याचे राज्यपाल, असा थक्क करणारा प्रवास डॉ. डी. वाय पाटील यांचा आहे. शिक्षण संस्थेत त्यांनी त्यांच्या कार्याचा ठसा हा देशातच नव्हे तर परदेशातही उमटवलेला आहे. याची दखल घेत भारत सरकारने डॉ. डी. वाय. पाटील यांना पद्मश्री पुरस्कारानेही सन्मानित केलेले आहे. विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते होणार असून किसन वीर साखर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंद आबा पाटील हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. १ लाख रूपये आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असल्याचेही श्री. शिंदे यांनी सांगितले.
आबासाहेब वीर सामाजिक पुरस्काराचे वितरण गोकुळाष्टमीस बुधवार दि. ६ रोजी सकाळी दहा वाजता कारखाना कार्यस्थळावर होणार असून कारखाना कार्यक्षेत्रातील सभासद, बिगर सभासद, कार्यकर्ते, वाहतूक कंत्राटदार, तोडणी मशीन मालक, विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी बहुसंख्येने कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहनही जिल्हा बँकेचे चेअरमन व मार्गदर्शक संचालक नितीन काका पाटील, कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे व संचालक मंडळाने केले आहे.













