Thu, Jan 15, 2026
ब्रेकिंग न्यूज सातारा जिल्हा

साताऱ्यात छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक होणार : खा. छत्रपती उदयनराजेंनी दिली माहिती

साताऱ्यात छत्रपती संभाजीराजेंचे भव्य स्मारक होणार : खा. छत्रपती उदयनराजेंनी दिली माहिती
Ashok Ithape
  • PublishedAugust 24, 2023

स्मारकासाठी पहिल्या टप्प्यातील २ कोटींचा निधी मंजूर ; नोंदणीकृत संस्थेचीही स्थापना

सातारा / प्रतिनिधी : ऐतिहासिक सातारा नगरीत छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक नसल्याची उणिव भासत होती. या करीता आम्ही शासनाकडे जरुर तो पाठपुरावा केला तसेच या नियोजित स्मारकाच्या दैनंदिन देखभाल व निगा राखण्यासाठी स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान, सातारा या नावाने रितसर नोंदणीकृत संस्था स्थापन करण्यात आली आहे. विशेष म्हणजे संस्थेचे नोंदणीपत्रही प्राप्त झाले, त्याच दरम्यान राज्य शासनाने या स्मारकासाठी रुपये 2 कोटीचा पहिल्या टप्प्यातील निधीदेखील मंजूर केला असल्याची माहीती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली आहे.

याबाबत श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी ‘संकल्प न्यूज’ला दिलेली माहिती अशी, स्वराज्याचे दुसरे छत्रपती यांना आपण सर्वांचे जाज्वल्य स्फूर्तीदायी व्यक्तीमत्व म्हणून ओळखतो. साता-यामध्ये त्यांनी त्याकाळी केलेल्या अवर्णनीय बाबी खुप मोठया संख्येने आहेत. असे असूनसुध्दा छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक साता-यामध्ये नाही, याची उणिव आमच्यासह सर्वानाच भासत होती. ऐतिहासिक व्यक्तीमत्वाचे स्मारक होण्यासाठी अनेक कसरती कराव्या लागत आहेत. तरीसुध्दा काहीही झाले तरी छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक साताऱ्यामध्ये सर्वांच्या सहकार्याने आणि सहभागातुन उभे करण्याचा आम्ही संकल्प सोडला होता. त्यादृष्टीने राज्य शासनाकडे आम्ही वेळोवेळी पाठपुरावा केला आणि चालु आहे.

या उपक्रमासाठी प्रथम सातारा शहरातील सर्वसमावेश व्यक्तींचा सहभाग असलेली एक संस्था “स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज स्मारक प्रतिष्ठान, सातारा” या नावाने आम्ही स्थापन केली. यामध्ये जेष्ठ पत्रकार आणि मार्गदर्शक हरिष पाटणे यांना उपाध्यक्ष तसेच गोडोलीचे विलासनाना शिंदे यांची सचिव म्हणून सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे. सर्वांचा आग्रह झाल्यामुळे संस्थेचे अध्यक्षपद आम्ही स्विकारले आहे. या संस्थेमध्ये सर्वश्री दत्तात्रय बनकर, जेष्ठ पत्रकार शरद काटकर, पत्रकार संघाचे शहराध्यक्ष विनोद कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगरसेवक वसंत लेवे, माजी पं.स.सदस्य संजय पाटील, माजी उपनगराध्यक्ष किशोरतात्या शिंदे, संग्राम बर्गे, अमित कुलकर्णी, अभिजीत बारटक्के, ईशाद बागवान, सुजित जाधव, सचिन साळुंखे, अमोलभाऊ तांगडे यांचा समावेश आहे.

छत्रपती संभाजी महाराज यांचा त्यांच्या लौकिकास शोभुन दिसेल असा पुतळा आणि स्मारक उभारणी करताना तसेच त्यानंतर त्याची निगा राखण्यासाठी या प्रतिष्ठानच्या माध्यमातुन सूचना प्रस्तावित केल्या जाणार आहेत. स्मारकाचे संपूर्ण काम सातारा नगरपरिषदेच्या माध्यमातुन होणार आहे. त्यासाठी नुकताच रुपये 2 कोटींचा पहिला टप्यातील निधी नगरपरिषदेस प्राप्त झाला आहे. यासाठी लागेल तितका निधी मंजूर केला जाणार आहे.

लवकरच प्रतिष्ठानची बैठक बोलावण्यात येणार आहे. त्या बैठकीत विशेष निमंत्रितांनाही बोलावण्यात येणार आहे. या स्मारकाचा आराखडा, नकाशा तसेच अन्य बाबींविषयी या बैठकीत विचारविमर्श करण्यात येणार असून, त्याप्रमाणे पुढील कार्यवाही नगरपरिषदेच्या माध्यमातून करण्यात येईल, असेही खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी नमूद केले आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!