भुईंज ग्रामपंचायतीच्या सीसीटिव्ही यंत्रणा खरेदीत लाखोंचा अपहार
![]()
माहिती अधिकारात गफला उघड : कारवाईची मागणी
भुईंज : अक्षरश: दुप्पट, चौपट किमती लावत खरेदी भुईंज ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या सीसीटिव्ही यंत्रणेत लाखोंचा अपहार व गफला माहिती अधिकारात उघड झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून या गफल्यास जबाबदार असणार्या संबंधितांवर तातडीने कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, की भुईंज ग्रामपंचायतीच्या वतीने सुमारे पाच लाख रुपये खर्च करुन सीसीटिव्ही यंत्रणा खरेदी केली. यासाठी नेहमीच्या पद्धतीने पोर्टल खरेदीचा आग्रह धरत आपल्याच हितसंबंधातील व्यक्तिकडून ही सर्व खरेदी झाली.
भुईंज ग्रामपंचायतीने ज्या कंपनीचे जे साहित्य खरेदी केले त्याच कंपनीच्या त्याच साहित्याचे दरपत्रक अधिकृतपणे घेतल्यानंतर पाच लाखांच्या खरेदीत तीन ते साडेतीन लाख रुपयांचा गफला झाल्याचे उघड झाले आहे. या सर्व प्रकाराने भुईंज परिसरात खळबळ उडाली आहे. पोर्टलद्वारे खरेदीचा आग्रह नेमका कशासाठी धरला जातो हेही यानिमित्ताने उघड झाले आहे.
चंद्रकांत उर्फ बाळासाहेब जाधवराव यांनी माहितीच्या अधिकारात सदरची माहिती प्राप्त केली. त्यावेळी निदर्शनास आलेल्या बाबी अत्यंत धक्कादायक आहेत. भुईंज ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या सीसीटिव्ही यंत्रणेच्या साहित्य किमतीत आणि प्रत्यक्ष बाजारपेठेतील किमतीत दुप्पट, चौपट तफावत आढळून आली. उदा. ग्रामपंचायतीने ज्या कंपनीचे कॅमेरे तब्बल ६२ हजारांना खरेदी केले आहेत त्याच कंपनीच्या त्याच दर्जाच्या कॅमेरांची किंमत २८ हजार रुपये आहे. ज्या वायरची खरेदी तब्बल ९२ हजार २५० रुपयांना केली आहे त्या वायरची किंमत अवघी २० हजार मिळाली आहे. जी हार्ड डीस्क २२ हजारांना खरेदी केली गेली आहे त्याच हार्डडीस्कची बाजारातील किंमत अवघी ६ हजार ५०० आहे. अशाच प्रकारचे वाढीव दर सर्व साहित्य खरेदीत लावून सुमारे तीन ते साडेतीन लाखांचा गफला झाल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे त्याच साहित्याचे बाजारपेठेतुन दरपत्रक (कोटेशन घेतले) त्यात हा फरक आढळून आलाच शिवाय त्या विक्रेत्यांनी सदर कोटेशनवर 20 ते 25 टक्के सूट देण्यात येईल असे सांगितले. भुईंज ग्रामपंचायतने केलेल्या खरेदीत सूट तर नाहीच उलट लाखोंचा गफला केला असून तो नेमका कोनाकोणाच्या खिशात गेला? असा प्रश्न उपस्थित झाला असून पोर्टलच्या नावाखाली झालेल्या सर्वच खरेदीची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.
या गफल्यात नेमके कोण कोण सहभागी आहेत याचाही शोध घेवून प्रशासनाने तातडीने कारवाई करणे गरजेेचे असून तसे न केल्यास या अपहार प्रकरणी सजग नागरिक संघातर्फे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून कारवाई होईपर्यंत पाठपुरावा करणार असल्याचे बाळासाहेब जाधवराव,अमित उर्फ पप्पुभाई सूर्यवंशी, तेज बाबर व ग्रामस्थांनी यांनी सांगितले.
प्रशासनाचे घोडे प्रा. आ. केंद्राच्या कारवाईत अडलं आता इथंही अडणार का ?
भुईंज ग्रामपंचातीत झालेल्या लाखोंच्या गफल्यास ग्रामविकास अधिकार्यासोबत इतर कोण सहभागी आहे याचाही शोध घेणे आवश्यक आहे. भुईंज प्रा. आ. केंद्राच्या प्रशासनाने सरकारी दवाखान्याचाच दारुचा अड्डा केला.
शासकीय इमारतीत बिअरबारमध्ये बसल्याच्या थाटात दारुच्या बाटल्या रिचवल्या जातात. वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशांत पंडीत माय माउल्यांशी उद्धट, उर्मट वागतात, आठ आठ दिवस दांडी मारतात, विद्यार्थ्यांना औषधे नाकारुन शिक्षकांना गेटआउटची भाषा वापरतात, महिला कर्मचारी अधिकार्यांपासून आमदारांपर्यंत जावून ढसाढसा रडल्या. याबाबत चौकशी झाली, पुराव्यानीशी तक्रारींचा ढिग जमा झाला, अगदी प्रा. आ. केंद्राचा बार केल्याच्या पुराव्यासह, तालुका प्रशासनाने कारवाईची शिफारस केली. या सर्व बाबीला १ महिना उलटला तरी डॉ. पंडीत यांच्यावर कारवाई झाली नाही.
तोच ढिम्मपणा जिल्हा प्रशासन ग्रामपंचायतीमधील लाखोंच्या गफल्यात दाखवणार की कारवाई करणार? असा प्रश्न जनतेत उपस्थित होवून या दोन्ही प्रकरणी कारवाई न झाल्यास डॉ. पंडीत यांच्यावर कारवाईचा शिफारस अहवाल आणि माहितीच्या अधिकारात उघड झालेला ग्रामपंचायतीतील लाखोंचा गफला या दोन्ही प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच प्रशासन एवढे ढिम्म गफलेबाज असेल तर महाराष्ट्रात काय परिस्थिती असेल? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.













