आईच्या स्मृतिदिनी नेत्रचिकित्सा शिबिर, विद्यार्थीनी व ज्येष्ठांना भेटवस्तू
![]()
कुसुमाई फाउंडेशनतर्फे उडतरे येथील बाबर कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी
भुईंज, उडतरे (ता. वाई) येथील गावचे सुपुत्र असलेल्या वरिष्ठ पोलीस अधिकारी व माजी सरपंच पुत्रांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ स्मृतिदिनाचे औचित्य साधून नेत्रचिकित्सा व मोतीबिंदू उपचार शिबिर व ज्येष्ठ नागरिक संघास खुर्च्यांची भेट तसेच शालेय विद्यार्थिनींना 25 बॅडमिंटन रॅकेट, शटलचे वाटप करून अनोख्या रीतीने सामाजिक बांधिलकी जपली आहे. संबंधित बाबर कुटुंबीयांच्या या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उडतरे येथील रहिवाशी व रोहा येथील वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर व त्यांच्या पत्नी सौ. लता बाबर, तसेच माजी सरपंच व किसन वीर साखर कारखान्याचे माजी संचालक प्रवीण बाबर व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या दिवंगत मातोश्री (कै.) कुसूम ज्ञानेश्वर बाबर यांच्या स्मरणार्थ दरवर्षी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रम राबवत असतात.
आईच्या स्मृती जागवण्यासाठी त्यांनी कुसुमावती फाउंडेशन नावाची सामाजिक संस्थाही स्थापन केली आहे. नुकत्याच झालेल्या आईच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त
कुसुमाई फाऊंडेशनतर्फे उडतरे येथे त्यांनी नेत्रतपासणी व मोतीबिंदू उपचार शिबीर गावात आयोजित केले होते.
‘कुसुमाई फाउंडेशन’च्या ‘दृष्टी अभियाना’च्या या पहिल्याच शिबिरात एकूण 109 नागरिकांची नेत्रतपासणी करण्यात आली. कुसुमाई फाऊंडेशन आयोजित या मोफत नेत्रतपासणी शिबीरांना उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.
श्री शाहू आय हॉस्पिटल, कोडोली, सातारा यांच्या सहकार्याने व उत्तरा जेष्ठ नागरिक संघ, उडतरे यांच्या मदतीने हे नेत्र तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते.
यावेळी 109 नागरिकांच्या नेत्रतपासणीत 24 रुग्णांना मोतीबिंदू असल्याचे निदान झाले. यापैकी अत्यावश्यक 9 रुग्णांना तात्काळ उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. तर याप्रसंगी 35 रूग्णांना अल्प दरात चष्मे वाटप करण्यात आले.
यावेळी कुसूमाई फाऊंडेशन चे मार्गदर्शक व वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर व त्यांच्या पत्नी सौ. लता बाबर यांच्या हस्ते उडतामरे गावातील इयत्ता 8वी, ते दहावीपर्यंतच्या 25 विद्यार्थिनींना खेळाची आवड निर्माण होणेसह शारीरिक तंदुरुस्तीसाठी बॅडमिंटन रॅकेट व शटलचे वाटप करण्यात आले.
तसेच प्रमोद बाबर यांनी आईच्या स्मरणार्थ उत्तरा जेष्ठ नागरिक संघास उत्तम दर्जाच्या 20 खुर्च्या देणगी स्वरुपात देण्याचे जाहीर केले.
यावेळी उत्तरा जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष धैर्यवान बाबर, गुरुजी, कार्याध्यक्ष शिवाजी बापूसाहेब पवार, सचिव सर्जेराव जाधव गुरुजी, खजिनदार दिलीपदादा जगताप, सुनील पवार, हिंदुराव पवार , जिजानानी जगताप, कमल बाबर ,जयंत बाबर, शेखर बाबर व उडतारे ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. आईच्या स्मरणार्थ बाबर बंधूंनी सामाजिक बांधिलकीतून राबवलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.













