Mon, Mar 2, 2026
अभिष्टचिंतन

बहुआयामी व्यक्तिमत्व – प्रमोद रांजणे

बहुआयामी व्यक्तिमत्व – प्रमोद रांजणे
Ashok Ithape
  • PublishedAugust 29, 2024

प्रतिकूलतेवर मात करून यशाचे गौरीशंकर गाठणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणजे रांजणी येथील प्रमोद रांजणे (सर), शुक्रवार, दि. 30 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने शिक्षक, पत्रकार, पोलीसमित्र, समाजसेवक, विज्ञाननिष्ठ, अभ्यासक आदी विविध पैलूंनी समृद्ध असलेल्या त्यांच्या जीवन कार्याविषयी…

बालपासूनच परिश्रमाची किनार असलेले जीवन ज्यांच्या वाटेस आले, असे प्रमोद रांजणे हे मूळचे रांजणी गावचे राहिवासी. प्रपंच चालवण्यासाठी त्यांच्या वडिलांनी पाचगणीत एका बंगल्यावर माळीकाम करण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यातूनच प्रमोद यांच्यावरही परिश्रम व शिक्षणाचे उत्तम संस्कार झाले. मुळच्या अभ्यासू वृत्तीला आणि हुशारीला गिरीनगरीत आणखी पैलू पाडण्यात त्यांना यश आले. विज्ञान शाखेतील पदवीधर झाल्यावर B.Ed. हा अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केला व देशाची भावी पिढी घडवणारा शिक्षक म्हणून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली.

विविध लहान-मोठ्या विद्यालयांमधून अध्यापनाचा अनुभव घेतल्यानंतर भिलार येथील सुप्रसिद्ध हिल रेंज हायस्कूलमध्ये ते नोकरीस लागले. त्या ठिकाणच्या प्रदीर्घ अनुभवाच्या बळावर पुढे त्यांना पाचगणी येथील विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून त्यांना नोकरीची संधी मिळाली. सध्या ते तेथे विज्ञान विभागप्रमुख म्हणून कार्यरत असून विद्यार्थीप्रिय शिक्षक अशी त्यांची ख्याती आहे. त्यांच्या सौभाग्यवतीही शिक्षिकाच असल्याने समान विचारधारेतून त्यांच्या जीवनाची नौका व्यवस्थितपणे मार्गस्थ झाली आहे.

ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत असतानाच त्यांनी गोडवली येथे हक्काचे घर घेतले, परंतू त्या व्यवहारात त्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागला आणि स्वतःच्या वेदना हटवतानाच संघर्षाशी दोन हात करता करता शिक्षकी पेशाच्या बरोबरीनेच त्यांनी पत्रकारितेचा मार्गही चोखाळला. समाजातील अन्यायग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हाती घेतलेल्या या व्रतामुळे त्यांची झुंजार पत्रकार अशीही ओळख निर्माण झाली. पाचगणी परिसरातील अनेक प्रश्न त्यांनी धडाडीने वृत्तपत्रांतून मांडले.

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपुरे यांच्या विचारांचे पाईक म्हणूनही त्यांची ख्याती आहे. श्री. राजपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक बांधिलकीतून विद्यार्थ्यांना पुस्तके व शालेय साहित्याचे वाटप, शासकीय रुग्णालयातील परिचारिकांचा सन्मान, रक्तदान व आरोग्य चिकित्सा शिबीरे आदींचे आयोजनही केले. अशा समाजसेवी वृत्तीतून त्यांची लोकप्रियताही वाढू लागली.

महाबळेश्वर तालुक्यातील इंग्रजी माध्यमाच्या विद्यालयांचे व्यवस्थापन समिती समन्वयक म्हणून शिक्षणाधिकारी आनंद पळसेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते सक्रिय आहेत. दरम्यान पोलीस मित्र म्हणूनही ते सुप्रसिद्ध आहेत. प्रशासन व पोलीस यंत्रणेच्या सर्व प्रकारच्या उपक्रमांतही ते हिरहिरीने सहभागी होत असतात. त्यांच्या एकत्रित कार्याचा आढावा घेता शिक्षक, समाजसेवक, पत्रकार व कुटुंबवत्सल व्यक्तिमत्व म्हणून विविध पैलूंनी त्यांचे जीवन समृद्ध झाल्याचे स्पष्ट होते. शिक्षकी पेशा आणि समाजसेवेची तळमळ असलेल्या या जिद्दी, अभ्यासू व संवेदनशील व्यक्तिमत्वाला वाढदिवसानिमित्त आरोग्यदायी दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या मनातील सर्व संकल्पना पूर्णत्वास याव्यात याच सदिच्छा.

टीम संकल्प न्यूज…

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!