Thu, Jan 15, 2026
Media

पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पुन्हा लढा उभारावा लागणार

पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पुन्हा लढा उभारावा लागणार
Ashok Ithape
  • PublishedFebruary 16, 2024
संभाव्य ब्रॉडकास्ट बिलाबाबत चिंता, छोट्या वृत्तपत्रांकडे सरकारचे दुर्लक्ष.
कराड :  मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एस. एम. देशमुख, किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे यांनी कराडमध्ये शासकीय विश्रामगृहावर कराडच्या पत्रकाराची सदिच्छा भेट घेतली. यावेळी कराडच्या पत्रकाराबरोबर विविध विषयांवर मनमोकळी चर्चा करत कराडमध्ये पत्रकारांचा वतीने लवकरच आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांना सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कराड तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रा. अशोक चव्हाण, पुणे अधिस्विकृती समितीचे सदस्य गोरख तावरे, प्रीतिसंगमचे संपादक शशिकांत पाटील, पत्रकार संघाचे खजिनदार देवदास मुळे, पुढारीचे ब्युरो चीफ सतीश मोरे, जगदीश पाटील, ई टिव्हीचे सुधीर पाटील, न्यूज लाईनचे प्रमोद तोडकर, यशवंत नगरीचे विकास भोसले, सकाळचे अमोल जाधव, न्यूज महाराष्ट्रचे सकलेन मुलाणी यांनी स्वागत केले.
कराडमध्ये २००५ साली आयोजित पत्रकार कार्यशाळेचा उल्लेख
कराड तालुका मराठी पत्रकार संघाने २००५ साली राज्यस्तरीय पत्रकार कार्यशाळा यशस्वीपणे आयोजित केली होती. या कार्यशाळेच्या विविध आठवणी जाग्या करत एस. एम. देशमुख, किरण नाईक यांनी कराडमधील एकूण पत्रकार सृष्टीची माहिती घेतली.
पत्रकार संरक्षण कायद्यासाठी पुन्हा लढा उभारावा
पृथ्वीराज चव्हाण हे राज्याचे मुख्यमंत्री असताना पत्रकार संरक्षण कायद्यासाठी कराडमध्ये आंदोलन झाले होते. पुढे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला. परंतु या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. तांत्रिक कारणांमुळेच पत्रकारांना याचे संरक्षण मिळत नाही. या कायद्यांतर्गत गुन्हे दाखल होत नाहीत. ही एक प्रकारे पत्रकारांची फसवणूक झाली असे असून याबाबत राज्यभरातील पत्रकारांनी आवाज उठवला पाहिजे, असे ते म्हणाले.
संभाव्य ब्रॉडकास्ट बिल बाबत चिंता
सोशल मीडियावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकार ब्रॉडकास्ट बिल आणत असून सोशल मीडियावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला घालण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत. हे बिल सोशल माध्यमातील पत्रकारांसाठी घातक ठरणार आहे. या कायद्याची अंमलबजावणी लोकसभा निवडणुकीनंतर होण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडिया अनियंत्रित असून या मीडियावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. या कायद्याला पत्रकारांनी विरोध करणे आवश्यक आहे, असे मत एस.एम. देशमुख यांनी यावेळी व्यक्त केले.
डिजिटल मीडियावर कार्यशाळेस सहकार्य करणार
वृत्तपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्यासमोर डिजिटल मीडियाचे आव्हान उभे राहत आहे. कोणतीही नाविन्यपूर्ण संकल्पना सुरू होताना खडखडाट होतो, तशी डिजिटल पत्रकारितेची अवस्था सध्या आहे. परंतु या क्षेत्राचा अभ्यास सर्व पत्रकारांनी करणे आवश्यक आहे. यादृष्टीने पुणे येथे परिषदेच्या वतीने डिजिटल मीडियाची कार्यशाळा आयोजित करणार असल्याचे एस. एम. देशमुख यांनी सांगितले. कराडमध्ये डिजिटल माध्यमे व नव तंत्रज्ञान या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असल्याचे पत्रकारांनी सांगितल्यानंतर या कार्यशाळेसाठी सहकार्य करण्याची ग्वाहीही एस. एम. देशमुख यांनी दिले आहे.
 छोट्या वृत्तपत्रांकडे सरकारचे दुर्लक्ष
कोरोनानंतर वृत्तपत्रे सृष्टीसमोर अनेक आव्हाने उभी राहिली असताना तसेच मुद्रीत माध्यमांसमोर महागाईचा प्रश्न उभा राहिला असताना केंद्र आणि राज्य सरकारने वृत्तपत्रांच्या प्रश्नांकडे अजिबात लक्ष दिले नाही. उलट छोट्या वृत्तपत्रांच्या अडचणी वाढविण्याचे प्रयत्न होत आहेत. पत्रकारांना सुविधा देण्याच्या फक्त घोषणा होतात. कार्यवाही होत नसल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली. साधे शासनाच्या पत्रकार पुरस्कारांचे वितरण गेली चार वर्षे झालेले नाही. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांना  वेळ नाही, असेही ते म्हणाले. कराडमधील जुन्या आणि नव्या पत्रकारांची माहिती घेत एकत्रित काम करा, असा सल्लाही त्यांनी दिला.
Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!