‘किसन वीर-खंडाळ्या’चे ऊस बील जमा ५ कोटी ७४ लाख ८४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा; प्रमोद शिंदे
वाई / दि. ८ : खंडाळा येथील किसन वीर-खंडाळा सहकारी साखर उद्योगाकडे सन २०२३-२४ मध्ये गळीताकरिता आलेल्या ऊसास प्रतिटन ३ हजार रूपयांप्रमाणे पहिल्या पंधरा दिवसांचे बील ५ कोटी ७४ लाख ८४ हजार ६६८ रूपये संबंधित सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांच्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खात्यावर जमा करण्यात आली असल्याची माहिती, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, खंडाळा तालुका शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२३-२४ चा गळीत हंगाम ११ नोव्हेंबरपासून सुरू झालेला होता. ११ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबरपर्यंत पहिल्या पंधरा दिवसांमध्ये १९ हजार १६१ मेट्रिक टनाचे गाळप झालेले होते. प्रतिटन ३ हजार रूपयांप्रमाणे ५ कोटी ७४ लाख ८४ हजार ६६८ रूपये वर्ग करण्यात आले आहे.
किसन वीर कारखान्याप्रमाणेच खंडाळा कारखान्यासही कोणतीच बँक वित्तपुरवठा होत नाही. त्यामुळेच दोन्ही कारखान्यांची बीले वर्ग करण्यास थोडासा विलंब झाला होता. परंतु यापुढील पंधरवड्याची बीले लवकरात लवकर वर्ग करण्यात येणार असल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
किसन वीर कारखान्याचा ३ हजार रूपये दर जाहिर केल्यानंतर खंडाळा कारखान्याच्या सभासद व बिगर सभासदांच्यामध्ये दराबाबत साशंकता होती. किसन वीरच्या सभासदांना ३ हजार रूपयांचा दर जाहिर केला आहे त्याप्रमाणेच खंडाळा कारखान्याच्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दर देण्याबाबत किसन वीर कारखान्याचे चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे महत्वपुर्ण काम केले असल्याचे यावेळी सांगितले.
कारखाना कार्यक्षेत्रातील सुज्ञ सभासद, बिगर सभासद शेतकऱ्यांची कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता आपला संपुर्ण ऊस हा किसन वीर व खंडाळा कारखान्यालाच घालावा, असे आवाहनही चेअरमन आमदार मकरंदआबा पाटील, व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, खंडाळा काखान्याचे चेअरमन व्ही. जी. पवार, व्हाईस चेअरमन राजेंद्र तांबे व संचालक मंडळाने केले आहे.













