सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत केला प्रवेश.
पुणे l संपत मोरे :
सुप्रसिद्ध अभिनेते किरण माने Kiran Mane यांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. राजकारणात इनिंग सुरु केली. किरण माने यांचं मूळ गाव सोनहिरा खोऱ्यात. चिंचणी अंबक. या गावात त्यांची भावकी आहे. त्यांचा जीवनप्रवास त्यांनी अनेकदा सांगितला आहे. पुढे काहीही निश्चित नसताना मळलेळी वाट सोडून हा माणूस अनिश्चित अशा अभिनयाच्या वाटेकडे आला.
महाराष्ट्रातले एक मोठे नेते पतंगराव कदम यांच्या घराचा आणि माने कुटूंबाचा मोठा जिव्हाळा. किरणदादांचे एक चुलते वसंतराव माने हे कदम साहेबांचे वर्गमित्र. त्यांच्यावर पतंगराव कदम यांचे एवढे प्रेम की, मूळची नोकरी सोडून त्यांनी माने यांना भारती विद्यापीठात मोठया पदावर नेमणूक दिलेली.
वसंतराव आणि पतंगराव यांची दोस्ती मतदारसंघात चर्चेची. तसेच किरणदादांच्या वडिलांबद्दलही त्यांना आपुलकी. राज्य शासनात सेवा करणारे मानेसायेब जिथं जिथं गेले त्या गावात नाती जिव्हाळा जोडत गेले. आजही त्यांच्याबद्दल त्या त्या गावातील लोक आपुलकीने बोलतात..
किरणच्या करियरसाठी चुलते आणि वडील यांनी नुसता शब्द टाकायचा अवकाश, पतंगराव साहेबांनी त्यांना मोठी संधी दिली असती. हजारो लोकांचे आयुष्य उभा केलेल्या कदमसाहेबांनी जवळच्या घरातील या पोराला चांगली संधी दिली असती पण त्याला रूढ करियर करायचे नव्हते, वेगळी वाट धरायची होती.. आणि किरणदादा मोठा स्ट्रगल करत त्या वाटेने गेला खूप मोठा झाला..
आजही राजकारणाच्या यशस्वी वाटा समोर आहेत, थोडेसे नमते घेतले असते तर इतर ठिकाणी चांगली संधी मिळाली असती पण शिवसेना हाच पक्ष त्यांनी निवडला आहे. या पक्षातली फूट आणि सद्यस्थिती यावर अनेक ठिकाणी बोललं जातंय लिहिलं जातंय अशा कमजोर पक्षात किरणदादाने प्रवेश घेतलाय..
महाराष्ट्रातले मोठे वस्ताद शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते साहेबराव पवार हे किरणदादांचे आजोबा आहेत, त्यांच्याकडूनही लढण्याचे संस्कार मिळाले आहेत. आजोळ आणि घराणं हे दोन्हीकडचं संचित सोबत घेऊन हा गडी आता वाटचाल करणार आहे. त्यांच्या वाटचालीस शुभेच्छा..













