Thu, Jan 15, 2026
आरोग्य

डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार

डेव्हिड आणि जेकब ससून इमारतीचे नूतनीकरण वारसा इमारतीला साजेसे व्हावे – उपमुख्यमंत्री अजित पवार
Ashok Ithape
  • PublishedNovember 27, 2023

पुणे, दि. २५: शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती या आपल्या सर्वांसाठी वारसा रूपाने मिळालेला खजिना आहे. डेव्हिड ससून आणि जेकब ससून या त्याच प्रकारच्या इमारती असून त्यांचे नूतनीकरण वारसा असलेल्या इमारतीला साजेसे व्हावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज डेव्हिड आणि जेकब ससून रुग्णालय वारसा इमारतीच्या नुतनीकरणाच्या कामाची आणि सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शेखर प्रधान, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, महामेट्रोचे महाव्यवस्थापक राजेंद्र पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता बाप्पा बहिर, ससून सर्वोपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. किरण जाधव, महामेट्राचे संचालक अनिल कोकाटे, राजीव त्यागी आदी उपस्थित होते.

डेव्हिड ससून आणि जेकब ससून इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामांची पाहणी करताना उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, नुतनीकरणाचे काम गुणवत्तापूर्वक होणे आवश्यक आहे. नूतनीकरणासाठी साहित्य चांगल्या प्रतीचे वापरावे, सिलींग व्यवस्थित असावे, रंगरंगोटी आकर्षक असावी, विद्युतीकरणाची कामे, जिन्याची कामे दर्जेदार होणे आवश्यक आहे.

उपमुख्यमंत्री श्री. पवार पुढे म्हणाले, वारसा असलेल्या ऐतिहासिक इमारती जपणे आणि त्यांचे संवर्धन करणे आपले कर्तत्व आहे. त्याचे नूतनीकरणही त्याच पद्धतीने होणे आवश्यक आहे. या वैशिष्ट्यपूर्ण कामांसह विकास कामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाहीदेखील त्यांनी दिली.

महात्मा गांधी यांच्यावर अपेंडिक्स शस्त्रक्रिया झाली होती त्या खोलीची पाहणी यावेळी श्री. पवार यांनी केली.

सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशनची पाहणी करताना श्री. पवार म्हणाले, प्रवाशांच्या सोयीसाठी सूचना फलक आणि दिशादर्शक फलक अधिक ठिकाणी लावण्यात यावेत. मेट्रो भवनाचे काम, दिवाणी न्यायालय ते स्वारगेट भूमीगत मेट्रोचे काम आणि रामवाडी ते रूबी हॉल मेट्रोचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे, असेही ते म्हणाले. यावेळी डॉ. दीक्षित यांनी मेट्रोस्टेशनच्या कामाबाबत माहिती दिली.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!