Fri, Apr 17, 2026
शिक्षण

‘सरस्वती’ पूजक झाली विद्यावाचस्पती

‘सरस्वती’ पूजक झाली विद्यावाचस्पती
Ashok Ithape
  • PublishedNovember 15, 2023

दीपिका सुर्यवंशी यांना फिजिक्समधील डॉक्टरेट

डॉक्टरेट पदवी प्राप्त होणं म्हणजे एखाद्या विषयात प्रभुत्व प्राप्त करणं. त्यासाठी अफाट कष्ट, प्रचंड अभ्यास आणि जिद्दच लागते. या साऱ्या साऱ्या गुणांची मेहनतीने पूजा बांधत पूर्वश्रमीच्या दीपिका बजरंग माने आणि आताच्या दीपिका सुमित सूर्यवंशी यांना फिजिक्स या विषयात शिवाजी विद्यापीठाने डॉक्टरेट (विद्यावाचस्पती) पदवी प्रदान केली.

ज्ञान क्षेत्रातील अधिकार दर्शवणारी ही सर्वोच्च पदवी तीही फिजिक्स सारख्या विषयात आणि कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाकडून प्राप्त होणे ही काही सामान्य गोष्ट नाहीच. त्यासाठी असामान्य कर्तबगरीच दाखवावी लागते. डॉ. दीपिका सूर्यवंशी यांनी ती दाखवली. भुईंजच्या घुमट आळीतील आमच्या सख्ख्या शेजारी घरातील ही विदुषी आहे या अभिमानासोबत ही विदुषी रेवाचीही शिक्षिका आहे याचा आनंद विशेष.

सरस्वती अकॅडमीचा व्याप यशस्वीपणे सांभाळत आणि स्वतःचा संसारही नेटकेपणाने करत ज्ञान क्षेत्री सर्वोच्च अधिकाराचा रोवलेला झेंडा हे या अलौकिक यशाला अधिक झळाळी देणारं आहे.

या पदवीसाठी डॉ. आर. व्ही. ढेकळे या प्रमुख मार्गदर्शकांसह डॉ. एल. डी. कदम यांचे मार्गदर्शन लाभलेच शिवाय बंधू राहुल माने आणि पती सुमित सूर्यवंशी आणि संपूर्ण कुटुंबियांची साथ अत्यंत मोलाची ठरली.

त्याबाबतचे एक उदाहरण सांगायचे तर प्रबंध सादर केल्यानंतर मुलाखत व्हायची होती. त्याचवेळी मम्मी म्हणजे डॉ. दीपिका यांच्या सासूबाई माजी ग्रा. पं. सदस्या विजयमाला सूर्यवंशी यांचे निधन झाले. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कुटुंबियांनी त्यांना भक्कम पाठिंबा देत मुलाखतीस  पाठवले. ही एकच नव्हे अशा अनेक अडचणी या वाटचालीत आल्या अगदी कोरोना काळासह. त्या सर्वांवर मात करीत काळाच्या भाळावर आपल्या ज्ञान समृद्धीची मोहोर उमठवली आणि दीपिका सुर्यवंशी आता डॉक्टर दीपिका सूर्यवंशी झाल्या. आनंद आहे तो त्याचा. त्याबाबतचे अधिकृत पत्र आता प्राप्त झाले असून त्याबद्दल डॉक्टर दीपिका सूर्यवंशी आणि सरस्वती अकॅडमीचे खूप खूप अभिनंदन. सरस्वती अकॅडमीचेही अभिनंदन का? तर डॉक्टर दीपिका यांच्यासाठी सरस्वती अकॅडमी हाच श्वास आणि ध्यास आहे. त्याच ध्यासातून या अकॅडमीला मेरिटबाबत अग्रस्थानी राखण्यासाठी जीवापाड मेहनत त्या घेत असतात.

अशा एखाद्या अकॅडमीची संचालक फिजिक्स या विषयात डॉक्टरेट असणं हे इथलं एकमेव उदाहरण आहे. आधीच म्हटल्याप्रमाणे ते त्यांनी अफाट मेहनत आणि अभ्यासाच्या बळावर निर्माण केलंय आणि खऱ्या अर्थाने सरस्वतीची पूजा बांधलीय. ती पूजा ‘सरस्वती’च्या सर्व साधकांना लाभदायी ठरेल हे नक्की.

राहुल तांबोळी, भुईंज

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!