हजारो दिव्यांनी उजळून निघाली चिंधवली : अखंडित दिपोत्सवाची उत्साहात दशकपूर्ती
![]()
ते थांबले नाहीत तर ते राबले, ते नुसतेच राबले नाहीत तर ते धावले, ते नुसतेच धावले नाहीत तर उत्साही वातावरणासाठी, प्रदूषणमुक्त दिवाळीसाठी त्यांनी मनामनात पेटवला समाधानाचा, विश्वासाचा आणि चांगल्या विचारांचा दिवा..
आयुष्याच्या जन्मापासून शेवटापर्यंत आपल्या साथीला असतो तो दिवा…प्रकाशाची, प्रगतीची वाट दाखविणारा दिवा…अंतरी ज्ञानदिप प्रकाशीत करणारा दिवा असतो.
दिवा, दिवाळी, दीपोत्सव, दिप, दिपक या शब्दांमध्ये तेज आहे, प्रकाश आहे,
म्हणजेच प्रगतीची वाट आहे, असा हा दरवर्षी य़ेणारा दिवाळी सण.
रोजही आपण म्हणतोच दिव्या दिव्या दिपत्कार पासून ते दिवा जळो देवापाशी उजेड पडो तुळशीपाशी, पण दिवाळी म्हटलं की दिव्यांच्या दिव्यत्वाची आठवण येतेच नां?
दिवा हे ज्ञानाचे, तेजाचे, प्रगतीचे प्रतीक आहे,
दिपावली म्हटलं की आकाशदिव्याबरोबर खाली मांडलेल्या सुंदर, आकर्षक तेल पंतीची आठवण होते,
या पणत्याच इतक्या सुंदर दिसतात की, त्यात *तेवत राहणारी तेलवात जीवनाच जगण्याच मोठं रहस्य सांगून जाते,*
त्यातील तेल स्वत: जळत ते जगाला उजळवण्यासाठी,
त्यात त्यांचा स्वत:चा कोणताच स्वार्थ नसतो.
प्रकाशमान होण्यासाठी लागणारा अग्नीसुद्धा त्या प्रकाशन्यापुरताच घेतात,
आपण आपल आयुष्य जगायचं आणि समाजाच, आपल्या कुटुंबाच आयुष्य उजळवण्यासाठी व्यतीत करावं, किती सुंदर संदेश पणतीमधे दडलेला आहे,
अगदी एखाद्या झोपडीतही ती तितकीच सुंदर दिसते आणि वृंदावनाजवळही.
आणि त्याच अनुषंगाने बालमित्रांनी पाडव्याच्या शुभमुहूर्त, तालिम सत्यनारायण पूजा आणि योगायोगाने जुळून आलेला बालदिन म्हणजे निर्मळ मनाला आणखी तेजोमय करण्याचा सर्वांगसुंदर आनंद आणि याच आनंदातून सामाजिक भान जागृत ठेवत समाजाला एक वेगळी दिशा देण्यासाठी या बालमित्रांनी दिपोत्सवातून उचललेले पाऊल नक्कीच भरारी घेणारेच…
स्वच्छ सुंदर परिसर सर्वांनाच हवाहवासा असतो आणि याच सुंदर परिसरात सुंदर गोष्ट घडली तर त्याचा मनस्वी आनंद शब्दात वर्णिला जात नाही आणि त्यासाठी या बालमित्रांनी कृष्णामाई घाट, ग्रामदैवत श्री नवलाई देवी परिसर, श्री दत्त मंदिर परिसर, श्री मरीआई मंदिर, श्री मारुती मंदिर परिसर, तालिम आणि सिमेंट रस्ता स्वच्छ केला, पंन्ती मांडणी, रांगोळी, गरजेला पडेल ते साहित्य उपलब्ध करण्यासाठी प्रत्येकजण नुसताच राबला नाही तर तहानभूक हरपून त्या नव्या आनंदात सामील झाला.
बालमित्र मैत्रिणींनी रंगबिरंगी आकर्षक रांगोळी काढून हजारो पंन्तींची मांडणी करत महिलावर्गाच्या हस्ते ग्रामदैवत श्री नवलाई देवी पासून दिपप्रज्वलन करण्यात आले,
टप्प्याटप्प्यावर केलेली आखणी आणि काटेकोर नियोजनामुळे परिसारातील संपूर्ण पंन्ती एकाच वेळेत प्रज्वलित झाल्यामुळे सर्व परिसर उजळून निघाला, अखंडित तेवत राहणाऱ्या पंन्त्या कॅमेराबद्ध करण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पुढे सरसावले, सर्वदूर, नजरेरला पडेल इथपर्यंत उजळलेला परिसर मन मोहून घेत होता.
प्रदूषणमुक्त आणि उजळणाऱ्या प्रत्येक दिव्यांनी लखलखीत प्रकाश किरण निर्माण करत दिवाळीचा खरा अर्थ सांगून दिला.
राबणाऱ्या, सहकार्य करणाऱ्या आणि हातभार लावणाऱ्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद, आणि खुप खुप आभार…!
दिपक पवार, चिंधवली.













