जिल्हास्तर युवा महोत्सव प्रवेशिका सादर करण्याचे आवाहन
सातारा दि. 13 (जिमाका) : युवकांचा सर्वांगीन विकास करणे, संस्कृती व परंपरा जतन करणे, युवकांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लावणे याकरिता दरवर्षी युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार सन 2023-24 हे वर्ष संयुक्त राष्ट्र संघाने “आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष, २०२३ म्हणून घोषीत केलेले असल्याने राष्ट्रीय युवा महोत्सवात महाराष्ट्र राज्यासाठी तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर , सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान ही संकल्पना दिलेली आहे. या सकल्पनेवर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या युवा महोत्सवामध्ये सांस्कृतिक (समुह लोकनृत्य, वैयक्तिक सोलो लोकनृत्य, लोकगीत, वैयक्तिक युवा लोकनृत्य), कौशल्य विकास (कथाकथन, पोस्टर स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, फोटोग्राफी) , संपल्पना आधारित स्पर्धा (तृणधान्य उत्पन्न वाढीसाठी विज्ञानाचा वापर, सामाजिक विकासात विज्ञानाचे योगदान) , युवा कृती (हस्तकला, वस्त्रोद्योग, अग्रो प्रोडक्ट) या प्रकारांमध्ये स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच विजेत्या स्पर्धाकांना रोख पारितोषिक देण्यात येणार आहे.
या युवा महोत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी युवक युवतींचे वय 15 ते 29 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक स्पर्धकांनी आपली प्रवेशिका दिनांक 23 नोव्हेंबर, 2023 पर्यंत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल, सातारा येथे सादर करण्यात यावी असे आवाहन नितीन तारळकर, जिल्हा क्रीडा अधिकारी, सातारा यांनी केलेली आहे.













