वाई पंचायत समितीमध्ये कृषी औजारांची सोडत चिठ्ठी टाकून
![]()
शेतकऱ्यांना सोमवार पासून मिळणार साहित्य
गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्या हस्ते सोडत प्रक्रिया
वाई / प्रतिनिधी :
वाई तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषद सेस फंडा अंतर्गत कृषी विभागाची औजारांची सोडत प्रक्रिया वाईचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्या हस्ते व सहाय्यक गटविकास अधिकारी मंगेश कुचेवार यांच्या उपस्थितीत पार पडली. ऑनलाइन पद्धतीने चिठ्ठी टाकून लाभार्थ्यांची निवड करण्यात आली. सोमवार पासून लाभार्थ्यांना साहित्य मिळणार आहे असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सेस फंडा अंतर्गत कृषी विभागाचे औजारांचे वाटप करण्याच्या अनुषंगाने सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रक्रियेला सुरुवात वाई पंचायत समितीच्या स्वर्गीय किसनवीर आबा सभागृहात वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नारायण घोलप यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी वाई तालुक्यातील लाभार्थ्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती.
सुरुवातीला कोळप्यांची सोडत काढण्यात आली. लाभार्थ्यांनी केलेले अर्ज आणि उद्दिष्ट यांचा ताळमेळ साधत चिट्टी पद्धतीने ही सोडत प्रक्रिया घेण्यात आली. सायकल कोळपे साठी सुरुवातीला 62 झाले होते. प्राधान्य क्रमाने चिठ्ठी टाकून आरक्षणा नुसार लाभार्थी निवड करण्यात आली. पीव्हीसी पाईप साठी 66 लाभार्थ्यांचे अर्ज आले होते. त्यातील चारच लाभार्थ्यांचे उद्दिष्ट असल्याने रँडम पद्धतीने चिठ्ठी टाकून लाभार्थी निवड करण्यात आली. 5 एचपी डिझेल इंजिन साठी लाभार्थी निवड केली त्याचबरोबर ताडपत्रीसाठी सर्वात जास्त अर्ज आले होते. 94 अर्ज तर दहा अवघे लक्ष होते.
3 एचपी विद्युत पंपासाठी 19 अर्ज पैकी 3 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. मधपेटी साठी 11 अर्ज आले होते त्यापैकी सर्वसाधारणमधून 9 अर्ज आले होते. तर 1 महिला लाभार्थी अर्ज आला होता. तर एक दिव्यांग लाभार्थी अर्ज होता. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी वाई पंचायत समितीच्या कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न केले. सोमवार पासून साहित्य मिळण्यास प्रारंभ होणार आहे असे कृषी विभागातून सांगण्यात आले.
माझे नाव का नाही
लाभार्थी निवड प्रक्रिया सुरू असताना पसरणीचे प्रवीण शिर्के यांनी माझे नाव का नाही अशी शंका उपस्थित केली त्यावेळी कृषी अधिकारी गोळे यांनी अर्ज दिल्याची पोच असेल तर दाखवा आपण चौकशी करू अशी ग्वाही त्यांना दिली.
दिव्यांग लाभार्थी वेटिंग वर
दिव्यांग शेतकऱ्यांनी लाभ मिळावा म्हणून आपले अर्ज दाखल केले होते. मात्र या लाभार्थी निवडीमध्ये सर्व साहित्यांच्या प्रवर्गामध्ये दिव्यांगाच्या कोट्यात ज्यांनी आपले अर्ज भरले होते. त्यांचे नाव वेटिंग लिस्टला ठेवण्यात आले आहे. जिल्हा पातळीवरून जसे आदेश येतील तसे कार्यवाही करण्यात येणार असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले.













