देगाव ता वाई येथे भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात रेडकू फस्त
देगाव I प्रतिनिधी : वाई तालुक्यातील देगाव येथे गेल्या काही दिवसांपासून भटक्या कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. गावातील बेंद नावाच्या शिवारात भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात श्री नंदकुमार गणपत इथापे यांचे रेडकू फस्त केल्याची घटना आज दुपारी घडली आहे. तसेच काही दिवसांपूर्वी श्री विकास संभाजी शिर्के व राजेंद्र तुकाराम चव्हाण यांच्या जनावरांवर सुद्धा या भटक्या कुत्र्यांच्या हल्ला झाला होता या हल्ल्यात सदर जनावरे दगावलेली आहेत.या घटनेने शेतकरी वर्गात भितीचे वातावरण आहे.
शेतात काम करणाऱ्या बऱ्याच लोकांनी या कुत्र्यांस झुंडीने पाहिले आहे. सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरू आहेत. मात्र, या भटक्या कुत्र्यांमुळे शेतकरी वर्गात भीती निर्माण झाली आहे. तसेच, बेंद शिवारातून देगाव किकली रोड जातो. त्यामुळे सदर कुत्र्यांची टोळी अचानक रोडवर आल्यास अपघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या भटक्या कुत्र्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.













