Thu, Jan 15, 2026
अध्यात्म स्थानिक बातम्या

कृष्णाकाठावर वसलेली प्राज्ञपाठशाळामंडळ ही संस्था म्हणजे एक जागतिक किर्तीचे ज्ञानपीठ

कृष्णाकाठावर वसलेली प्राज्ञपाठशाळामंडळ ही संस्था म्हणजे एक जागतिक किर्तीचे ज्ञानपीठ
Ashok Ithape
  • PublishedAugust 19, 2023

कृष्णाकाठावर वसलेली प्राज्ञपाठशाळामंडळ ही संस्था म्हणजे एक जागतिक किर्तीचे ज्ञानपीठ असून या संस्थेने गेल्या १०० वर्षात संस्कृती रक्षणाचे व धर्मरक्षणाचे जे काम केले ते अलौकिक असून हे कार्य नवीन पिढीपुढे येण्याची गरज आहे.

वाई दि. १९ ऑगस्ट २०२३ :

यातूनच आपल्या दीर्घकाळच्या मानवी संस्कृतीची ओळख नवीन पिढीला होईल असा मला विश्वास वाटतो.” असे मत उत्तराखंडमधील हरिद्वार येथे असणा-या पतंजली योगपीठाचे मुख्यकेंद्रीय प्रभारी डॉ. स्वामी परमार्थदेव यांनी व्यक्त केले. स्वामी परमार्थदेव व त्यांच्या सहका-यांनी वाई येथील प्राज्ञपाठशाळामंडळाचे संस्थापक, अध्यक्ष स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या समाधीस भेट दिल्यानंतर हे मत व्यक्त केले. त्यावेळी संस्थेचे सचिव अनिल जोशी व सहसचिव भालचंद्र मोने यांनी स्वामी परमार्थदेव यांचा यथोचित सन्मान केला.

प्राज्ञपाठशाळामंडळाच्या कार्यालयात गेल्या ७०० वर्षांपूर्वीच्या हस्तलिखित संस्कृत पोथ्यांचा संग्रह पाहिल्यानंतर स्वामी परमार्थदेव म्हणाले, “या संस्थेत फार मोठे ऐतिहासिक कार्य सुरू असून येथे संस्कृतीचे रक्षण होते आहे. त्याचप्रमाणे मानवी धर्माचेही रक्षण होते आहे असे सांगून परमार्थदेव म्हणाले”, आपल्या भारतीय संस्कृतीची पूर्ण ओळख अलीकडच्या नवीन पिढीस नाही याचा मला खेद होतो.

येथील ऐतिहासिक कार्य समजून घेण्यासाठी विविध महाविद्यालयांतील व विद्यापीठांतील प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी त्या संस्थेस भेट देणे गरजेचे आहे मुख्य म्हणजे या संस्थेत २६२ वर्षांपूर्वी लिहिली गेलेली श्री. गिरीधर पारगावकर यांची ‘ज्ञानेश्वरी’ची प्रत मला पाहण्यास मिळाली याचा मला आनंद वाटतो. आपल्या या संस्थेने चारही वेदांचे ग्रंथरूपाने रक्षण केले आहे. असून हे ग्रंथ आपणास स्व-धर्माची ओळख करून देतात ही बाब लक्षात घेण्यासारखी

या संस्थेने दुर्मीळ अशा वीस हजार ग्रंथांचा संग्रह केला असून हे सर्व ग्रंथ आपल्या संस्कृतीची ओळख करून देणारे आहेत. स्वामी केवलानंद सरस्वती यांच्या अलौकिक बुद्धीचा उल्लेख करताना स्वामी परमार्थदेव म्हणाले, केवलानंद सरस्वती यांचे ३ महत्त्वाचे शिष्य होऊन गेले त्यामध्ये विनोबा भावे यांना ‘भारतरत्न’ हा किताब मिळाला. डॉ. पां. वा. काणे यांना १९६३ मध्ये ‘भारतरत्न’ हा किताब देऊन केंद्र सरकारने त्यांना गौरविले आहे. त्यांचे तिसरे शिष्य तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे ‘पद्मविभूषण’ या किताबाने सन्मानित झालेले होते आणि त्यांनीच आपल्या भारतीय राज्यघटना प्रसिद्ध झाल्यापासून तीन महिन्यांत संस्कृतमध्ये भाषांतर केले. ही बाब प्राज्ञपाठशाळामंडळाची बौद्धिक उंची साकार करणारी आहे, असेही मत स्वामी परमार्थदेव यांनी व्यक्त केले.

यावेळी संस्थेचे सचिव अनिल जोशी, सहसचिव भालचंद्र मोने व स्वामी परमार्थदेव, संचालक नंदकुमार बागवडे, रामचंद्र खोपटीकर हे उपस्थित होते. संस्थेचे सहसचिव भालचंद्र मोने यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!