चीनमध्ये झालेल्या 31 व्या जागतिक विद्यापीठ क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी केलेल्या कामगिरीची पंतप्रधानांकडून प्रशंसा
नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2023
31 व्या जागतिक विद्यापीठ क्रीडास्पर्धांमध्ये 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 10 कांस्यपदकांसह एकूण 26 पदके पटकावत विक्रमी कामगिरी केलेल्या भारतीय खेळाडूंची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. वर्ष 1959 मध्ये जागतिक विद्यापीठ क्रीडास्पर्धांच्या आयोजनाला सुरुवात झाल्यापासून भारताने या स्पर्धांमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे यावर भर देत पंतप्रधानांनी या यशाबद्दल सहभागी क्रीडापटू, त्यांचे कुटुंबीय आणि प्रशिक्षक यांचे अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले:
“प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी क्रीडाक्षेत्रातील कामगिरी!
31 व्या जागतिक विद्यापीठ क्रीडास्पर्धांमध्ये एकूण 26 पदके मिळवून भारतीय खेळाडूंनी संपादन केले विक्रमी यश! आपली ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे ज्यात 11 सुवर्ण, 5 रौप्य आणि 10 कांस्यपदकांचा समावेश आहे.
देशासाठी गौरवापूर्ण विजय मिळवणाऱ्या आणि उदयोन्मुख खेळाडूंना प्रेरणा देणाऱ्या आपल्या अतुलनीय खेळाडूंना सलाम.”
“सर्वात आनंददायी बाब अशी आहे की वर्ष 1959 मध्ये जागतिक विद्यापीठ क्रीडास्पर्धांच्या आयोजनाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत भारताने एकूण 18 पदके मिळवली होती आणि म्हणूनच यावर्षीची 26 पदकांची अनुकरणीय कमाई खरोखरच उल्लेखनीय आहे.
ही चमकदार कामगिरी म्हणजे आपल्या खेळाडूंच्या अविचल समर्पणवृत्तीचा पुरावा आहे. सर्व खेळाडू, त्यांचे कुटुंबीय आणि प्रशिक्षक यांचे मी या यशाबद्दल अभिनंदन करतो आणि आगामी काळातील स्पर्धांसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.”













