जननायक नामदार मकरंदआबा पाटील यांच्या वाढदिनी कारखाना कार्यस्थळावर महाआरोग्य शिबीर
भुईंज, दिः २७ : महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर कारखान्याचे चेअरमन जननायक नामदार मकरंदआबा पाटील यांचा गुरूवार (दि.२९) रोजी वाढदिवस आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व आपले लाकडे नेते अजितदादा पवार यांचे झालेले अपघाती निधन व राज्यात पडलेला दुष्काळ या कठीण परिस्थितीमुळे नामदार मकरंदआबा पाटील हे वाढदिवस साजरा करणार नसल्याने कार्यकर्त्यानी अभिष्टचिंतनाचे बोर्ड न लावण्याचे आवाहन केलेले असुन शुभेच्छाही स्विकारणार नाहीत. समाजाला आपण काहीतरी देणं लागतो,या भुमिकेतुन सर्वसामान्य जनतेसाठी कारखाना कार्यस्थळावर महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले असुन राज्यामध्ये रक्ताचा जाणवणारा तुटवडा लक्षात घेता, याप्रसंगी रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
प्रसिद्धीपत्रकात श्री. शिंदे यांनी पुढे म्हटले आहे की, कारखाना कार्यस्थळावर किसन वीर कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक काँग्रेस व मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल , शेद्रे-सातारा येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, वाई ग्रामीण रूग्णालय व भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर, रक्तदान, मोफत मोतीबिंदु निदान शिबीर, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यत होणार आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तुचे वाटप करण्यात येणार आहे. वाई येथील ग्रामीण रूग्णालयातील रूग्णांना फळे वाटप करण्यात येणार असुन पाचवड येथील आपुलकी मतीमंद मुलांच्या शाळेतील विद्यार्थ्याना अन्नदान करण्यात येणार असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकात दिलेली आहे. परिसरातील जनतेने या महाआरोग्य शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहनही श्री. शिंदे यांनी केलेले आहे.





















