कर्मवीरांच्या मुष्टीफंडाचा वारसा जपला!
वडूथच्या विद्यार्थ्यांकडून आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी दहा पोती धान्य संकलित
भुईंज : प्रतिनिधी
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या मुष्टीफंड उपक्रमाचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत रयत शिक्षण संस्थेच्या इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, वडूथ येथील विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. साताऱ्यातील शाहू बोर्डिंगमध्ये वास्तव्यास असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी विद्यार्थ्यांनी तब्बल दहा पोती धान्य संकलित करून मदतीचा हात दिला. विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी मिळावी, या उदात्त हेतूने कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातील धनिणीच्या बागेत वसतिगृह सुरू केले. सुरुवातीच्या काळात वसतिगृहासाठी शासनाची कोणतीही मदत उपलब्ध नसताना विद्यार्थ्यांच्या भोजनाचा प्रश्न निर्माण झाला. त्यावेळी कर्मवीर अण्णांनी खेड्यापाड्यांत जाऊन नागरिकांना मूठभर धान्य देण्याचे आवाहन केले. समाजानेही या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याच उपक्रमाला ‘मुष्टीफंड’ म्हणून ओळखले जाते. या मुष्टीफंडाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार मिळाला.
कर्मवीरांच्या विचारांचा वारसा कृतीतून जपला!
कर्मवीर अण्णांच्या याच सामाजिक विचारांचा वारसा वडूथ येथील विद्यार्थ्यांनी पुढे नेला आहे. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नवनाथ जगदाळे यांनी विद्यार्थ्यांना मुष्टीफंड उपक्रमाची माहिती दिली. साताऱ्यातील शाहू बोर्डिंगमध्ये कर्मवीर अण्णांनी सुरू केलेले वसतिगृह आजही सुरू असून, येथे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले वास्तव्यास आहेत. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी आपणही मुष्टीफंड उपक्रम राबवावा, असे आवाहन त्यांनी केले.
मुख्याध्यापकांच्या आवाहनाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. घराघरांतून, गावातून आणि परिसरातून धान्य संकलित करण्यात आले. यामध्ये गहू, ज्वारी, तांदूळ, डाळी तसेच विविध कडधान्यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांनी संकलित केलेले तब्बल दहा पोती धान्य शाहू बोर्डिंगमध्ये प्रत्यक्ष पोहोचविण्यात आले.
या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी केवळ धान्यदान केले नाही, तर सामाजिक संवेदनशीलता, सहकार्याची भावना आणि गरजू विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी यांचेही दर्शन घडवले. कर्मवीरांच्या विचारांची शिकवण प्रत्यक्ष कृतीतून देणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.
या उपक्रमात विभागीय अधिकारी, विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. नवनाथ जगदाळे, लाईफ वर्कर अजय दिघे, उपशिक्षिका श्रीमती इताले एच. व्ही., स्कूल कमिटी सदस्य श्री. भानुदास साबळे, श्री. विक्रांत साबळे, सर्व शिक्षक व सेवकवर्ग, गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
फोटो कॅप्शन : वडूथ येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी संकलित केलेले धान्य.





















