संध्या बेनकर यांना राज्यस्तरीय ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान
![]()
राष्ट्रभक्ती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्याची दखल; तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते सन्मान
धायरी (पुणे) : प्रतिनिधी
धायरी (ता. हवेली) येथील राष्ट्रभक्ती सामाजिक संस्थेच्या संस्थापिका सौ. संध्या किरण बेनकर यांना सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल राज्यस्तरीय ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. पुणे प्रहार आणि दैनिक आरंभ पर्व यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या पुरस्कार सोहळ्यात समाजसेविका तृप्तीताई देसाई यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
धायरी फाटा येथील सिल्वर प्रिंटर्सच्या सभागृहात या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजकार्य, कर्तृत्व, जिद्द, संघर्ष आणि समाजपरिवर्तनाचा ध्यास घेऊन विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला पुण्याच्या महापौर सौ. मंजुषाताई नागपुरे, समाजसेविका तृप्तीताई देसाई आणि यशस्विनी विकास प्रतिष्ठानच्या संस्थापिका सुनीताताई डांगे यांची प्रमुख उपस्थिती होती. दैनिक आरंभ पर्वच्या सुरेखाताई मते, निवासी संपादक लक्ष्मण साबळे, अभिनेत्री मोनालिसा बागल, मयुरी नव्हते, स्नेहा बालतांडे आणि सुप्रिया धोत्रे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
राज्यस्तरीय ‘नवदुर्गा पुरस्कार’ प्रदान करताना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ देऊन पुरस्कारार्थी महिलांचा गौरव करण्यात आला. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना या वेळी सन्मानित करण्यात आले.
सौ. संध्या बेनकर यांनी राष्ट्रभक्ती सामाजिक संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या या सन्मानाबद्दल नगरसेवक काकासाहेब चव्हाण, धायरीच्या माजी सरपंच जयश्रीताई पोकळे, समाजसेविका तृप्तीताई पोकळे, अनिताताई जोशी, आशाताई बेनकर, किरण बेनकर तसेच राष्ट्रभक्ती सामाजिक संस्थेचे सर्व सदस्य आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
छायाचित्र ओळ : राज्यस्तरीय ‘नवदुर्गा पुरस्कार’ सौ. संध्या बेनकर यांना प्रदान करताना समाजसेविका तृप्तीताई देसाई, सुरेखाताई मते व इतर मान्यवर.





















