वाईत प्रथमच ‘लघु कुंभमेळा-२०२६’चे आयोजन; २१ ते २५ मेदरम्यान धार्मिक उत्सवाची पर्वणी
![]()
देशभरातील ३५० साधू-संत, नागा संन्यासींची उपस्थिती; महागणपती घाटावर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
वाई : वाई शहरात प्रथमच भव्य स्वरूपात ‘लघु कुंभमेळा-२०२६’चे आयोजन करण्यात आले असून, २१ ते २५ मेदरम्यान महागणपती घाट येथे विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत. वाई नगरपरिषद तसेच लघु कुंभसेवा समिती व शक्ती शिवगंगा अटल आश्रम यांच्या संयुक्त विद्यमाने हा धार्मिक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
या कुंभमेळ्यात देशभरातील सुमारे ३५० साधू-संत, नागा संन्यासी, महामंडलेश्वर आणि विविध आखाड्यांचे संत सहभागी होणार आहेत. हरिद्वार, उज्जैन, प्रयागराज आणि त्र्यंबकेश्वर येथील कुंभमेळ्यांप्रमाणेच वाईचे धार्मिक महत्त्व राष्ट्रीय स्तरावर पोहोचावे, हा या आयोजनामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले.
कुंभमेळ्यादरम्यान २१ मे रोजी भूमिपूजन व छावणी प्रवेश, २२ मे रोजी धर्मध्वजा आरोहण, २३ मे रोजी विष्णूयाग व सार्वजनिक हवन, २४ मे रोजी हिंदू महासभा व दीप प्रज्वलन, तर २५ मे रोजी नागा संन्यासींचे पावन स्नान, भव्य रथ शोभायात्रा आणि महिला कलश शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे.
या सोहळ्यासाठी अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष श्रीमहंत रवींद्रपुरीजी महाराज यांच्यासह विविध पीठाधीश्वर उपस्थित राहणार आहेत. तसेच मंत्री, खासदार, आमदार आणि विविध क्षेत्रातील मान्यवरही या धार्मिक सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
दरम्यान, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कृष्णा नदीत पुरेसे पाणी सोडण्याची मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.





















