आसरे येथे ‘शासकीय सेवांच्या शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; एकाच छताखाली ४१५ शासकीय लाभांचे वाटप
![]()
महसूल प्रशासन सर्व जातींचे दाखले देण्यासाठी कटिबद्ध : डॉ. योगेश खरमाटे
वाई, प्रतिनिधी : शासनाच्या विविध योजना आणि सेवा थेट ग्रामस्थांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर’ आसरे येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले. या शिबिराला पश्चिम भागातील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
माननीय उपविभागीय अधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार सोनाली मेटकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. खरमाटे यांनी महसूल प्रशासन सर्व जातींचे दाखले वेळेत व पारदर्शक पद्धतीने देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.
शिबिरात विविध महसुली व शासकीय सेवांचा लाभ नागरिकांना जागेवरच देण्यात आला. त्यामध्ये आधार कार्ड अपडेट २३, सातबारा उतारे १६५, खाते उतारे ३५, फेरफार नोंदी ४७, फार्मर आयडी ११, रेशन कार्डसंबंधित सेवा १७, कुणबी प्रमाणपत्रे ३८, डोंगरी दाखले २५, डोमासाईल प्रमाणपत्रे ३०, उत्पन्न दाखले २४ अशा विविध सेवांचा समावेश होता. एकूण ४१५ लाभार्थ्यांना या शिबिरातून थेट लाभ मिळाला.
शिबिरामध्ये अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या महसूल व इतर विभागांच्या कामांचा तातडीने निपटारा करण्यात आला. त्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. शासनाच्या योजना व सेवा समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरामुळे परिसरात समाधानाचे वातावरण निर्माण झाले.
सदर कार्यक्रमाचे नियोजन धोम मंडळाधिकारी श्रीकांत धनावडे, ग्राम महसूल अधिकारी निलेश भोसले, शितल वाघ, संतोष जगताप, पोलीस पाटील तसेच महसूल सेवक यांनी अचूकपणे पार पाडले. कार्यक्रमासाठी आसरे गावचे सरपंच, सोसायटी सचिव आणि प्रतिष्ठित ग्रामस्थ यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.













