Thu, Apr 2, 2026
सामाजिक

आईच्या स्मृतिदिनानिमित्त वाघमोडे बंधूंचा आदर्श उपक्रम; ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ११५ महिलांना साडी वाटप

आईच्या स्मृतिदिनानिमित्त वाघमोडे बंधूंचा आदर्श उपक्रम; ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, ११५ महिलांना साडी वाटप
Ashok Ithape
  • PublishedMarch 18, 2026

सामाजिक बांधिलकी जपत डोंगर-दऱ्यातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न; प्रवीण काकडे यांचे कौतुक

सातारा : कै. जिजाबाई निवृत्ती वाघमोडे (रा. वाघमोडेवाडी, ता. माण, जि. सातारा) यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त श्री उल्हासराव वाघमोडे व संजय वाघमोडे या दोन्ही अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत एक प्रेरणादायी उपक्रम राबवला. शाहुवाडी तालुक्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्प परिसरातील कळमतळी व अंबाईवाडा येथे ११३ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच ११५ महिलांना साडी वाटप करण्यात आले.

या उपक्रमाचा शुभारंभ मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष पटकारे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास प्रवीण काकडे (महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ) यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना प्रवीण काकडे म्हणाले की, वाघमोडे बंधूंनी जपलेली सामाजिक बांधिलकी समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारी आहे. इतर अधिकाऱ्यांनीही अशाच प्रकारे समाजासाठी पुढाकार घेऊन सामाजिक जबाबदारी पार पाडावी.

यावेळी वाघमोडे बंधूंनी आपल्या आईच्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, जिजाबाई वाघमोडे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून मुलांना शिक्षण दिले. त्यांच्या संस्कारामुळेच आज आम्ही उच्च पदांवर कार्यरत आहोत. शिक्षणाशिवाय समाजाचा विकास शक्य नाही, त्यामुळे डोंगर-दऱ्यातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. पुढेही प्रत्येक वर्षी हा उपक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमास मारुती झोरे, नामदेव लांबोर, विठ्ठल येडगे, विठ्ठल गावडे, सुशांत माळी, अर्जुन चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!