कोट्यवधींच्या ‘एम्बरग्रीस’ तस्करीचा पर्दाफाश; महाबळेश्वरमध्ये वनविभागाची मोठी कामगिरी
![]()
महाबळेश्वर वनपरिक्षेत्रात वनविभागाची धडक कारवाई; तीन वाहनांसह मुद्देमाल जप्त
सातारा | दि. ०५ : ‘एम्बरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) तस्करीप्रकरणी सातारा वनविभागाने मोठी कारवाई करत ५.३०० किलो ‘एम्बरग्रीस’ तीन वाहने व इतर मुद्देमालासह सात संशयितांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई महाबळेश्वर वनपरिक्षेत्रात गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आली.
दि. ०५/०३/२०२६ रोजी सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण), सातारा यांना ‘एम्बरग्रीस’ तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर महाबळेश्वर (प्रा.) व सातारा येथील संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन पथकाने संयुक्तपणे वेण्णालेक व मेटतळे परिसरात सापळा रचला. संशयित इसम घटनास्थळी येताच धाड टाकून Ertiga (MH-43-BK-9863), Swift (MH-04-FR-0430) व TATA Nexon (MH-07-AG-6008) ही वाहने थांबवून तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान अतुल अशोक विश्वासराव (ठाणे पश्चिम), आकाश श्यामसुंदर धुरी (मालवण), एवझन क्लेमेंत फर्नांडीस (मालवण), हितेंद्र मनोहर शेट्ये (लालबाग-परळ), कौस्तुभ मिलिंद प्रभू (धनकवडी, पुणे), मोहन हरिभाऊ पाटील (भावेघर, ठाणे) व विल्सन झुजे फर्नांडीस (मालवण) यांना एम्बरग्रीससह ताब्यात घेण्यात आले.
या प्रकरणी वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ अंतर्गत कलम २, ९, ३९, ४४, ४८अ व ५१ अन्वये वनगुन्हा क्रमांक वप्रा-०१/२०२६ नोंदविण्यात आला आहे. अंबरग्रीस हा अनुसूची-१ मधील संरक्षित घटक असून त्याची विक्री, साठवणूक, वाहतूक वा व्यापार करणे हा दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा आहे. दोषी आढळल्यास ७ वर्षांपर्यंत कारावास व रु. ५ लाखांपर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकते.
या तस्करीमध्ये इतर आरोपींचा सहभाग आहे का, याचा अधिक तपास वनपरिक्षेत्र अधिकारी महाबळेश्वर (प्रा.) श्री. महादेव मोहिते करीत आहेत. दरम्यान, अशा प्रकारच्या वनगुन्ह्यांमध्ये सहभागी होऊ नये, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन वनविभागाने केले आहे.
ही कारवाई उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक श्री. प्रदीप रौंधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. महादेव मोहिते, श्री. गणेश महांगडे यांच्यासह वनपाल व वनरक्षकांच्या उपस्थितीत यशस्वीरीत्या पार पडली.













