राज्यस्तरीय आर्चरीत संगविवेक आर्चर्स अकॅडमीचे नेत्रदीपक यश
![]()
17 व्या मिनी सब-ज्युनिअर स्पर्धेत 1 सुवर्ण, 5 रौप्य व 1 कांस्य पदकांची कमाई
भुईंज प्रतिनिधी : सोलापूर जिल्ह्यातील अरण येथे दि. 28 फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान पार पडलेल्या 17 व्या मिनी सब-ज्युनिअर (15 वर्षांखालील मुला-मुलींच्या) राज्यस्तरीय आर्चरी स्पर्धेत संगविवेक आर्चर्स अकॅडमीच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन करत क्रीडाक्षेत्रात आपली गुणवत्ता सिद्ध केली.
या स्पर्धेत अकॅडमीच्या खेळाडूंनी 1 सुवर्णपदक, 5 रौप्यपदके व 1 कांस्यपदक अशी उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. उत्कृष्ट खेळाच्या जोरावर मयांक महामुनी व सई मोहिते यांची आंध्र प्रदेश येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच श्रेयस वाईकर, प्रचिती इथापे, समीक्षा भोसले व आदिती पोळ यांनी सांघिक गटात रौप्य व कांस्यपदके पटकावली.
देगाव गावची कन्या कु. प्रचिती प्रमोद इथापे हिने विशेष चमकदार कामगिरी करत मुलींच्या गटात सातारा संघाला महाराष्ट्रात द्वितीय स्थान मिळवून देत रौप्यपदक पटकावले. ती संगविवेक आर्चर्स अकॅडमीची खेळाडू असून श्री महालक्ष्मी इंग्लिश मीडियम स्कूलची इयत्ता आठवीची विद्यार्थिनी आहे.

याअभिमानास्पद यशाबद्दल भुईंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. पृथ्वीराज ताटे, पोलीस कॉन्स्टेबल श्री. बल्लाळ व श्री. जाधव यांनी यशस्वी खेळाडू व प्रशिक्षक श्री. ओंकार भागवत यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच श्री महालक्ष्मी शाळेतील शिक्षकवृंद, देगाव गावचे सरपंच श्री. सूरज पिसाळ, उपसरपंच श्री. किरण इथापे व ग्रामस्थांचे मोलाचे प्रोत्साहन लाभले.
या सर्वांचे तसेच अकॅडमीचे प्रशिक्षक श्री. ओंकार भागवत सर यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
फोटो ओळी : विजेत्या स्पर्धकांसोबत भुईंज पोलीस स्टेशनचे सपोनी श्री. पृथ्वीराज ताटे. छाया: सचिन इथापे.














