भुईंजमध्ये रंगणार राज्यस्तरीय कबड्डीचा थरार
भुईंज प्रतिनिधी : महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री स्व. अजित (दादा) पवार यांच्या स्मरणार्थ तसेच कै. मंगल जाधव यांच्या पुण्यस्मरणार्थ, महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद (आबा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा जिल्हा कबड्डी पुरुष व महिला अजिंक्यपद निवड चाचणी स्पर्धा २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
भुईंजचे उपसरपंच शुभम पवार यांच्या पुढाकारातून, महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशन व सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा दि. ७ व ८ मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी मैदान, भुईंज येथे पार पडणार आहेत.
या स्पर्धेत विजेत्या संघास प्रथम क्रमांक ₹३१,००१, द्वितीय क्रमांक ₹२१,००१, तृतीय क्रमांक ₹११,००१ व चतुर्थ क्रमांक ₹७,००१ अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच उत्कृष्ट रेडर, उत्कृष्ट डिफेंडर व बेस्ट प्लेअर ऑफ द टूर्नामेंट यांना आकर्षक सायकल बक्षिसांनी गौरविण्यात येणार आहे.
स्पर्धेसाठी सहभागी सर्व कबड्डी संघांना भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली असून, सर्व संघांना मानांकन व सन्मानचिन्हे प्रदान केली जाणार आहेत. कै. परमेश्वर गाडे यांच्या स्मरणार्थ सर्व संघांना चषक व सन्मानचिन्ह देण्यात येणार आहेत.
या भव्य क्रीडा महोत्सवासाठी अनेक उद्योजक व क्रीडाप्रेमींनी सहकार्य केले असून, सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. तरी दि. ७ व ८ मार्च रोजी छत्रपती शिवाजी मैदान, भुईंज येथे क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.













