आकाशाला गवसणी! पांचगणीत ‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चा जागतिक जल्लोष
![]()
‘पॅराग्लायडिंग वर्ल्ड कप २०२६’चे दिमाखदार उद्घाटन; २५ देशांतील २०० स्पर्धकांचा सहभाग
पांचगणी | प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालय व हाय फ्लाय पॅराग्लायडिंग, पांचगणी यांच्या संयुक्त विद्यमाने, पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली Paragliding World Cup 2026 चे आज पांचगणी येथे मोठ्या उत्साहात उद्घाटन झाले. आतापर्यंत प्रामुख्याने युरोपीय देशांमध्ये होणाऱ्या या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे यजमानपद यंदा प्रथमच भारताला—आणि तेही पांचगणीला—मिळाल्याने सातारा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब ठरली आहे.
जगातील सुमारे २५ देशांतील २०० नामांकित स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले असून, परीक्षणासाठी Paragliding World Cup Association चे अध्यक्ष गोरान यांच्यासह जागतिक दर्जाचे तज्ज्ञ पंच उपस्थित आहेत.
उद्घाटन नितीन काका पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी सांगितले की, या स्पर्धेमुळे पांचगणीची ओळख केवळ पर्यटन स्थळापुरती न राहता जागतिक पातळीवरील ‘पॅराग्लायडिंग हब’ म्हणून निर्माण होईल.
याप्रसंगी सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक चे संचालक राजेंद्र शेठ राजपुरे यांनी पर्यटनाला चालना मिळून स्थानिक नागरिकांसाठी रोजगाराच्या संधी वाढतील, असे नमूद करत १५ ते २१ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या स्पर्धेचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमास पांचगणी नगरपालिकेचे अध्यक्ष दिलीप बगाडे, दांडेघर गावच्या सरपंच सृष्टी खरात, माजी सरपंच शंकर कळंबे, नगरसेवक परवीन मेमन, नारायण बिरामणे, प्रकाश गोळे, सुप्रिया माने तसेच टेक्निकल टीममधील कृष्णकांत भागरा, श्री. दोहरा आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे स्वागत व आभार हाय फ्लाय पॅराग्लायडिंगचे चेअरमन अनुपम जाधव पाटील यांनी मानले. १५ ते २१ फेब्रुवारीदरम्यान चालणाऱ्या या जागतिक स्पर्धेमुळे पांचगणीकरांसह पर्यटकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.













