स्वयममधून उमटली लक्ष्मीची पाऊले! ग्रामीण महिला उद्योजकतेसाठी नेरोलॅकचे सामाजिक उत्तरदायित्व
![]()
उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर
चिपळूण: प्रतिनिधी – ब्रॅण्डिंग पॅकेजिंग लोगो सोशल मीडिया यासह व्यवसायाकडे उद्योग म्हणून पाहण्याची दृष्टी विकसित झाल्याने केवळ दीड महिन्याच्या कार्यकाळात
७ लाख ८२ हजार ३६३ रुपयांची उलाढाल करीत स्वयंम मधून लक्ष्मीची पाऊले उमटल्याची भावुक प्रतिक्रिया कार्यशाळेत उमटली. निमित्त होतं कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून व उपक्रम अंमलबजावणी संस्था दिशान्तर यांच्या विद्यमाने ग्रामीण महिला उद्योजकांसाठी गेले सात महिने सुरू असलेल्या कार्यशाळेच्या समारोप प्रसंगाचे!
चिपळूण शहरातील ब्राह्मण सहाय्यक संघाच्या सभागृहामध्ये कार्यशाळा समारोपप्रसंगी आनंदाने पाणावलेल्या डोळ्यांनी आपली यशोगाथा सांगणाऱ्या ग्रामीण महिला उद्योजकांना प्रशस्ती तथा गौरव पत्र तसेच विशेष भेट वसु देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महिलांच्या या यशदायी वाटचालीने कंपनी अधिकारी सुखावले.
“जेव्हा एखादी महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होते, तेव्हा केवळ तिचे कुटुंबच नाही तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था सावरली जाते. ‘स्वयम्’ प्रकल्पाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या सुप्त गुणांना आणि उद्योजकीय ऊर्जेला मिळालेले हे व्यासपीठ भविष्यात क्रांती घडवेल,” असा विश्वास *कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेडचे सीएसआर प्रमुख श्री. संतोष देशमुख** यांनी व्यक्त केला.
उद्योजकतेची नवी ‘अर्थसूत्री’
कार्यक्रमाची सुरुवात कंपनी अधिकाऱ्यांच्या पारंपारिक औक्षण करुन झाली. यानंतर कार्यशाळेतील मार्गदर्शकांपैकी अभिषेक कदम यांनी पीपीटी प्रेझेंटेशनद्वारे ‘स्वयम्’ कार्यशाळेतून महिलांना उमगलेली ‘अर्थसूत्री’ मांडली. यलो रिबिन एनजीओ फन फेअर पुणे, माणगाव येथील कोकण फेस्टिवल, गणपतीपुळे येथील सरस प्रदर्शन, मुंबई येथील एहसास मेळा अशा ठिकाणी महिलांनी व्यवसायातून साधलेली मोठी उलाढाल लक्षवेधी ठरली. कार्यशाळेतील काही महिलांनी केवळ दीड महिन्यातच विविध वस्तू प्रदर्शन व विक्रीतून तब्बल पावणे आठ लाखाहून अधिक रक्कमेची उलाढाल केली.
स्वयम्: स्वावलंबनाचे नाव
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दिशान्तर संस्थेच्या संस्थापक सचिव सौ. सीमा यादव यांनी प्रकल्पाचे प्रास्ताविक केले. त्यांनी कार्यशाळांच्या आयोजनामागची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “ग्रामीण महिलांमध्ये जिद्द आहे, पण त्यांना व्यवसायाचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळणे आवश्यक होते. दिशान्तरने कन्साई नेरोलॅक पेंट्सच्या सहकार्याने या महिलांना केवळ प्रशिक्षण दिले नाही, तर उद्योजक बनण्याचा आत्मविश्वास दिला आहे. ‘स्वयम्’ हे केवळ नाव नसून तो या महिलांच्या स्वावलंबनाचा एक मंत्र आहे.” त्यांच्या या अभ्यासपूर्ण प्रास्ताविकाने संपूर्ण कार्यक्रमाची दिशा स्पष्ट केली.
भावूक अनुभव कथन
या सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले ते महिला उद्योजकांचे अनुभव कथन. सारिका पाटील, अर्चना साळवी, प्रियांका बहुतुले, निमिषा पिलवलकर, शुभांगी शिवदास, मानसी पाटणकर, स्मिता काणेकर, नीलम पवार आणि अपर्णा कुलकर्णी या महिलांनी अत्यंत भावूक होऊन आपले मनोगत व्यक्त केले. “स्वयम् प्रकल्प आमच्यासाठी केवळ एक प्रशिक्षण नव्हते, तर ते आमचे कुटुंब होते. येथे मिळालेला आत्मविश्वास आणि कौशल्याच्या जोरावरच आम्ही ग्रामीण उद्योजक म्हणून यशस्वी होऊ,” अशी ग्वाही त्यांनी दिली.
कृतज्ञता आणि विश्वास
कार्यक्रमात दिशान्तर संस्थेच्या वतीने कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड प्रति सन्मानचिन्ह देऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. लोटे प्लांटचे मनुष्यबळ विकास व्यवस्थापक *श्री. नंदन सुर्वे* यांनी दिशान्तर संस्थेसोबतच्या प्रदीर्घ अनुभवाचा गौरव केला. “दिशान्तर सोबत महिला सक्षमीकरणासाठी केलेले प्रत्येक काम घरघोस यश देऊन गेले आहे, भविष्यातही हे सहकार्य असेच राहील,” असे त्यांनी नमूद केले.
उद्योजकांचा विशेष गौरव
कार्यशाळेमध्ये सातत्यपूर्ण आणि सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या *१० महिला उद्योजकांचा* यावेळी विशेष भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. या महिलांनी प्रशिक्षणातील प्रत्येक तंत्र आत्मसात करून स्वतःचा व्यवसाय वृद्धिंगत करण्याच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिशान्तर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश जोष्टे यांनी केले.
हे यश सुखावणारे! प्रकल्पाच्या यशस्विता सुखावणारी आहे. महिलांनी व्यक्त केलेल्या भावना आणि कार्यशाळेतून मिळालेली परिणामकारकता यातून व्यवसाय वृद्धिगत झाल्याचे पाहून या स्वयम् प्रकल्पाची सार्थकता सिद्ध झाली आहे.
श्री. संतोष देशमुख, सी.एस. आर. प्रमुख
कन्साई नेरोलॅक पेंट्स लिमिटेड













