Thu, Jan 15, 2026
शिक्षण

ज्ञानदीप स्कूलचा ‘दशावतार – विष्णुपुराण’ थीमवर आधारित सांस्कृतिक व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात

ज्ञानदीप स्कूलचा ‘दशावतार – विष्णुपुराण’ थीमवर आधारित सांस्कृतिक व वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा उत्साहात
Ashok Ithape
  • PublishedDecember 30, 2025

वाई :दि २९:- दशावतार – विष्णुपुराण या पौराणिक संकल्पनेवर आधारित ज्ञानदीप स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, वाई यांचा भव्य सांस्कृतिक व वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम अत्यंत उत्साहात व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना व सर्वांगीण विकासाला चालना देणारा हा कार्यक्रम उपस्थितांच्या विशेष कौतुकाचा विषय ठरला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. एकनाथ जगताप होते. प्रमुख पाहुणे म्हणून साताराचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. अनिस नायकवडी तसेच विशेष अतिथी वाईचे तहसिलदार सौ. सोनाली मेटकरी उपस्थित होत्या.यावेळी ज्ञानदीप क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष जिजाबा पवार, विश्वनाथ पवार,उपाध्यक्ष चंद्रकांत ढमाळ, सचिव चंद्रकांत शिंदे, विद्यावर्धिनी संस्थेचे सचिव बाळकृष्ण पवार सौ.तनिशा नायकवडी आदी मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
मार्गदर्शनपर भाषणात श्री. अनिस नायकवडी यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या उत्कृष्ट सूत्रसंचालनाचे विशेष कौतुक केले. ज्ञानदीप स्कूल हे केवळ शैक्षणिक गुणवत्ता नव्हे, तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविणारे आदर्श विद्यालय असल्याचे त्यांनी नमूद केले.

यावेळी मा. सौ. सोनाली मेटकरी यांनी आपल्या मनोगतात वाई तालुका शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असल्याचे सांगत पालकांनी आपल्या पाल्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ज्ञानदीप स्कूलसारख्या विश्वासार्ह शैक्षणिक संस्थेवर भरवसा ठेवावा, असे आवाहन केले.
संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. एकनाथ जगताप यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून संस्थेच्या शैक्षणिक व सांस्कृतिक वाटचालीची माहिती दिली. प्राचार्या सौ. शुभांगी पवार यांनी शैक्षणिक, सहशैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा समावेश असलेला सविस्तर वार्षिक अहवाल वाचून दाखविला. उपाध्यक्ष मा. श्री. चंद्रकांत ढमाळ यांनी सर्वांचे आभार मानले.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, राज्य व राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू, इयत्ता दहावीतील गुणवंत व टॉपर विद्यार्थी, तसेच बेस्ट को-ऑपरेटिव्ह पालक यांचा सत्कार करण्यात आला. शालेय उत्कृष्ट कामगिरीसाठी रेड हाऊस ला प्रथम पारितोषिक प्रदान करण्यात आले. याशिवाय शाळेचे हितचिंतक व विविध क्षेत्रातील योगदानासाठी उत्कृष्ट क्रीडा शिक्षक श्री. सचिन लेंभे, मार्गदर्शक श्री. वजीर शेख, उत्कृष्ट दिग्दर्शक श्री. इम्रान मुजावर, उत्कृष्ट संवाद लेखक श्री. अशोक बेडेकर यांनाही गौरविण्यात आले.स्कुलला सर्व दृष्टीने प्रगतीपथावर नेणाऱ्या प्राचार्या शुभांगी पवार यांचाही नायकवडी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सांस्कृतिक कार्यक्रमात सुमारे ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. दशावतार या मुख्य संकल्पनेभोवती गुंफलेले नृत्य, गायन, वादन, नाट्यीकरण, संवाद, वेशभूषा व केशभूषा यांचे सादरीकरण प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे ठरले. याशिवाय बंबल बी, द वर्ल्ड डान्स पार्टी, टोकाटोका, छावा, नागिन, चक दे इंडिया, पिंगा, तात्या विंचू आदी गीतांवर आधारित सादरीकरणांनी कार्यक्रमात रंगत आणली. लोकसंस्कृती जपण्यासाठी लोकगीते व लोकनृत्यांचा ही समावेश करण्यात आला.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन लेंभे सौ. गीतांजली शिवरकर, सौ. स्वप्ना गिजरे, तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रतिनिधी कु. शालवी पवार आणि कु. अर्णव जाधव यांनी अथक परिश्रम घेतले. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या सूत्रसंचालनासाठी इयत्ता चौथी ते नववीच्या २७ विद्यार्थ्यांचे प्रशिक्षण सौ. शीला खाडे व सौ. अस्मिता भोसले यांनी दिले.सुत्रसंचलन विद्यार्थीनी श्रेया बाबर व ज्ञानदा फणसे यांनी केले.

या कार्यक्रमास दिलीप चव्हाण,प्रा दत्तात्रय वाघचौरे,दुष्यंतराव जगदाळे, रविंद्र केंजळे,विजय कासुर्डे, दत्ता मर्ढेकर, राहुल जगदाळे ,अनुप पवार, पालक, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच वाई तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी :- सरस्वतीचे पूजन करतांना अंनिस नायकवडी शेजारी जिजाबा पवार, विश्वनाथ पवार, चंद्रकांत ढमाळ, एकनाथ जगताप, बाळकृष्ण पवार आदी

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!