वाई तालुका मराठी पत्रकार संघ, लो.टिळक स्मारक संस्था व सर्वांगी प्रतिष्ठान तर्फे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार.
वाई, दि.२९:- अन्य शहराप्रमाणे आज वाईतही वाहतुकीची कोंडी, पार्किंग आणि कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. त्यावर नगराध्यक्ष व नगरसेवकांनी राजकीय हेवेदावे व पक्ष बाजूला ठेवून ‘ मायक्रो प्लॅनिंग ‘ करून योग्य उपाय करावेत अशी सामान्य नागरिकांची अपेक्षा असते. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण घेतलेल्या प्रत्येक निर्णयाला सुशिक्षीत नागरिक आणि सामाजिक संस्था निश्चित साथ देतील यात शंका नाही, असे प्रतिपादन बालाजी ट्रस्टचे संस्थापक राजेंद्र चोरगे यांनी केले.
तालुका मराठी पत्रकार संघ, लो.टिळक स्मारक संस्था, व सर्वांगी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत आणि सर्व ११ प्रभागातील नगरसेवक व नगरसेविका यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्यवाह शिरीष चिटणीस होते. यावेळी श्री.सावंत, सरिता सावंत, दत्ता मर्ढेकर, सचिन ननावरे,व राजेश भोज व्यासपीठावर उपस्थित होते.
श्री.चोरगे म्हणाले, नगराध्यक्ष व नगरसेवक यांना समाजात अनन्यसाधारण महत्व असते. दुर्दैवाने आज राजकारण विचित्र झाले असून कोण कोणत्या पक्षात आहे हे समजत नाही. त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दिसून येतो. ज्या शहरात नळाचे पाणी डोळे झाकून पिता येते, रस्त्यावर कचरा व खड्डे आढळत नाहीत, कचऱ्यापासून खत, वीज निर्मिती केली जाते. एक मिनिटही वीज जात नाही. गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य असून महिला सुरक्षित असतात. त्यालाच खऱ्या अर्थाने विकासाची व्याख्या म्हणता येईल. त्या दृष्टीने विचार करून नगराध्यक्ष व नगरसेवकांनी आपल्या शहराचा विकास पॅटर्न राबवावा.
श्री. चिटणीस म्हणाले, शहराचा नगराध्यक्ष होणे ही आयुष्यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. त्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याची तसेच शहराच्या उन्नती बरोबर स्वतःची प्रगल्भता ‘ मॅच्युरिटी ‘ वाढविण्याची संधी असते. त्यामुळे कारभार करताना कोणी टीका केल्यास चिडून न जाता त्यातून बोध घ्यावा. शहरात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचा पुतळा बसवण्यात यावा, असे सांगितले.
श्री. सावंत म्हणाले, आम्ही सर्वजण महायुतीतील मित्रपक्ष असल्याने कोणतेही राजकारण न करता सर्व सहकारी नगरसेवकांना विश्वासात घेऊन शहराच्या सर्वांगीण विकास करू आणि जनतेच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घेऊ. हद्दवाढ न झाल्याने शहराचा विकास खुंटला असून त्यास प्राधान्य देऊन नवीन विकास आराखडा तयार करण्यात येईल. पालिका व ‘दक्षिणकाशी ‘ वाईला तीर्थक्षेत्राचा ‘ ब ‘ मिळविण्यासाठी पाठपुरावा करून शहरातील गटारे व रस्ते याबरोबरच पार्किंग समस्या, वाहतूक कोंडी, सार्वजनिक स्वच्छता, वारसा स्थळाचे जतन, पर्यटन तसेच शैक्षणिक विकास यासाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले.
यावेळी भारत खामकर, व डॉ. जागृती पोरे यांनी मनोगत व्यक्त केले. आदित्य चौंडे व विश्वास पवार यांची भाषणे झाली. दत्तात्रय मर्ढेकर व सचिन ननावरे यांनी स्वागत केले. राजेश भोज यांनी प्रास्ताविक केले. तनुजा इनामदार यांनी प्रमुख पाहुण्यांचा तर विठ्ठल माने, अशोक येवले यांनी पालिका पदाधिकाऱ्यांचा परिचय करून दिला. सोनाली भोज यांनी सन्मान पत्र वाचन केले. रंगता बेडेकर हिने सूत्रसंचालन केले. भद्रेश भाटे यांनी आभार मानले. कार्यक्रमास सर्व नगरसेवक नगरसेविका, तिन्ही संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
छायाचित्र ओळी – नूतन नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा सत्कार करताना राजेंद्र चोरगे, शिरीष चिटणीस, त्यावेळी सचिन ननावरे, दत्ता मर्ढेकर, सरिता सावंत, राजेश भोज )













