गुंतवणुकदारांनी फसवणूक चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे आवाहन
सातारा दि.29- विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस आणि विश्वकर्मा सुपरमार्ट प्रा. लि., कोडोली, सातारा या कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास १३.५ टक्के दराने परतावा देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याबाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे गु.नॉ.क्र. ८७४/२०२३, कलम ४०६, ४०९, ४२०, ३४ भारतीय दंड संहिता, कलम ३ व ४ महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्हयाचा तपास सातारा शहर पोलीस ठाण्याकडून सुरु होता. परंतू सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा यांचेकडे पुढील तपासकामी वर्ग करण्यात आला आहे.
विश्वकर्मा सुपरमार्ट सर्व्हिसेस आणि विश्वकर्मा सुपरमार्ट प्रा. लि., कोडोली, सातारा व त्यांच्या इतर शाखांमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी आर्थिक व अन्य गुंतवणूक केली आहे, अशांनी दि.3 ते 9 जानेवारी 2026 या कालावधीत सकाळी 10 वा. ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा येथे चौकशीकामी उपस्थित राहण्याचे आवाहन आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी केले आहे.
सर्व गुंतवणूकदारांनी चौकशी कामी उपस्थित राहताना गुंतवणूक केल्याचा पुरावा, गुंतवणूकदाराचे बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची ठळक व सुस्पष्ट दिसणा-या २ झेरॉक्स प्रती., गुंतवणूकदाराचे आधारकार्ड, गुंतवणूकदाराचे पॅनकार्ड, गुंतवणूकदारास अंशतः किंवा पुर्णतः किंवा गुंतवणूकदारास व्याजासह मिळालेल्या परताव्याचा पुरावा, बैंक खात्यास जे वारसदार आहेत, त्यांचे आधारकार्ड व पॅन कार्डाच्या कागदपत्रांच्या ठळक व सुस्पष्ट दिसणा-या २ झेरॉक्स प्रती आणाव्यात.
सातारा शहर पोलीस ठाणे येथे दाखल वरील गुन्हयाच्या तपासात पुरावा गोळा करण्यासाठी तसेच गुंतवणूकदारांची रक्कम परत मिळण्यासाठी महाराष्ट्र ठेविदारांचे (वित्तीय संस्थामधील) हितसंबंधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ या कायद्यान्वये करावयाच्या कार्यवाहीसाठी वरील प्रमाणे नमुद वेळी, नमुद कागदपत्रांसह गुंतवणूकदारांनी उपस्थित राहण्यास आवाहनही करण्यात आले आहे.
विश्वकर्मा सुपरमार्ट सव्हीसेस आणि विश्वकर्मा सुपरमार्ट प्रा. लि., कोडोली, सातारा कंपनीने केलेल्या फसवणूकीबाबत काही गुंतवणूकदारांनी केलेल्या तक्रारीनुसार (१) दहीवडी पोलीस ठाणे, जि. सातारा येथे गु.नॉ.क्र. ७६४/२०२३, कलम ४२०, ३४ भारतीय दंड संहिता, कलम ३ महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थामधील) हितसंबधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ अन्वये आणि (२) वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे, जि. पुणे येथे गु.नों.क्र. ६६/२०२४, कलम ४०६, ४२०, ३४ भारतीय दंड संहिता, कलम ३ व ४ महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थामधील) हितसंबधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ अन्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. या गुन्ह्यांच्या तपासकामी ज्यांनी या संबंधीत पोलीसांकडे जबाब दिलेले आहेत, त्यांनी वर नमुद कालावधीत आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा येथे उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.













