Thu, Jan 15, 2026
पर्यावरण

बीडजवळील ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेता सयाजी शिंदे यांच्या पर्यावरणीय संकल्पनेला मोठा धक्का

बीडजवळील ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेता सयाजी शिंदे यांच्या पर्यावरणीय संकल्पनेला मोठा धक्का
Ashok Ithape
  • PublishedDecember 25, 2025

बुधवारी रात्री ९ च्या सुमारास डोंगराला आग; हजारो झाडे भस्मसात, वन विभाग-अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न

बीड l प्रतिनिधी : बीड शहराच्या जवळ अभिनेता सयाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘सह्याद्री देवराई’ या महत्त्वाकांक्षी पर्यावरण संवर्धन प्रकल्पाला बुधवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. सायंकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास डोंगराच्या एका भागातून आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या आणि काही क्षणांतच या आगीने रौद्र रूप धारण करत संपूर्ण डोंगररांग व्यापली.

या आगीत डोंगरावरील हजारो लहान-मोठी झाडे होरपळून खाक झाली असून, जैवविविधतेला मोठा फटका बसला आहे. अनेक वर्षांच्या मेहनतीतून उभ्या राहिलेल्या या देवराईच्या आगीमुळे पर्यावरणप्रेमी, नागरिक आणि निसर्गसंवर्धकांमध्ये तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

आगीची माहिती मिळताच वन विभागाचे कर्मचारी आणि बीड नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मात्र डोंगराळ व चढ-उताराचा परिसर असल्याने आग विझवताना जवानांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. वाऱ्यामुळे आग अधिकच भडकत होती, त्यामुळे नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करावे लागले.

वन कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तसेच स्थानिक तरुणांनी एकत्रितपणे आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणण्यात काही प्रमाणात यश आले असले तरी मोठ्या क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून स्पष्ट झाले आहे.

‘सह्याद्री देवराई’ हा प्रकल्प केवळ वृक्षलागवड नव्हे तर संपूर्ण परिसंस्थेचे संवर्धन करणारा आदर्श उपक्रम म्हणून ओळखला जात होता. या आगीमुळे निसर्गाचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, तसेच आगीचे नेमके कारण शोधून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!