Thu, Jan 15, 2026
राजकीय बातमीपत्र

मंत्री मकरंद पाटलांचा बालेकिल्ला ढासळला; वाई नगरपालिकेत भाजपची ऐतिहासिक मुसंडी

मंत्री मकरंद पाटलांचा बालेकिल्ला ढासळला; वाई नगरपालिकेत भाजपची ऐतिहासिक मुसंडी
Ashok Ithape
  • PublishedDecember 22, 2025

नगराध्यक्षपदासह भाजपाचे ११ सदस्य विजयी; राष्ट्रवादी १२ वर, अपक्ष १,  सत्ता स्थापनेसाठी भाजपला निर्णायक संधी

वाई नगरपालिकेच्या अत्यंत चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरलेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्षपदासह १० जागांवर विजय मिळवला. दीर्घकाळ राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या वाई नगरपालिकेत झालेल्या या निकालामुळे मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांना आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडणारा राजकीय संदेश मतदारांनी दिला आहे.

नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत भाजपाचे अनिल सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार प्रा. डॉ. नितीन कदम यांचा २१५९ मतांनी पराभव केला. अनिल सावंत यांना १२,२८१ मते, तर डॉ. नितीन कदम यांना १०,१२२ मते मिळाली. काँग्रेसचे प्रदीप जायगुडे यांना ३२४, अपक्ष दीपक जाधव यांना २७२ मते मिळाली असून १८४ मतदारांनी नोटाचा वापर केला.

  • प्रचारात ‘स्टार प्रचारकांची’ फौज

राष्ट्रवादी काँग्रेस अजितपवार गट आणि भाजपानेही ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवत जोरदार प्रचार केला होता. महसूल मंत्री ना. चंद्रकांत बावनकुळे, सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, ग्रामविकास मंत्री ना. जयकुमार गोरे, माजी आमदार मदन भोसले, महिला आघाडी अध्यक्षा सुरभी भोसले यांच्यासह अनेक नेत्यांनी प्रचारात सहभाग घेतला.

राष्ट्रवादीकडून मंत्री ना. मकरंद पाटील हेच प्रमुख चेहरा होते. त्यांना खासदार नितीन पाटील व स्थानिक कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभले.

शिवसेनेकडून पालकमंत्री व पर्यटन मंत्री ना. शंभुराजे देसाई यांनी प्रचारात हजेरी लावली, मात्र शिवसेनेचा एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही.

  • प्रभागनिहाय चुरस, काही ठिकाणी ‘काठावरचा’ विजय
    नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीत भाजपाला प्रभाग २, ५, ६, ७, ८, १० आणि ११ मध्ये आघाडी मिळाली. विशेषतः प्रभाग ११ मध्ये भाजपाला १०३७ मतांचे निर्णायक मताधिक्य मिळाले. तर राष्ट्रवादीला प्रभाग १, ३, ४ आणि ९ मध्ये आघाडी मिळाली.
    प्रभागनिहाय निवडणुकीत अनेक ठिकाणी अत्यंत कमी मताधिक्याने निकाल लागले.

सर्वाधिक मताधिक्य – प्रभाग ३ ब मधील राष्ट्रवादीच्या डॉ. जिविता अतुल जमदाडे (७५६ मते)
सर्वात कमी मताधिक्य – भाजपाच्या दिपाली सावंत (फक्त २१ मते)

  • अपक्षांचा ‘किंगमेकर’ रोल

सर्वसाधारण प्रभाग ९ ब मधून नागरिकांच्या मागास प्रवर्गातील अपक्ष उमेदवार सुशील खरात यांनी १३५ मतांनी विजय मिळवत निकालात वेगळे स्थान निर्माण केले. एकूण बलाबल पाहता भाजप ११, राष्ट्रवादी काँग्रेस १२ (यात १ बिनविरोध), आणि अपक्ष १ असे चित्र स्पष्ट झाले आहे. मात्र नगराध्यक्षपद भाजपाकडे गेल्याने सत्ता स्थापनेसाठी भाजपाला निर्णायक संधी निर्माण झाली आहे.

  • निकालानंतर जल्लोष, प्रशासनाची काटेकोर व्यवस्था

निकाल जाहीर होताच विजयी उमेदवार व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी, गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. विविध प्रभागांत विजयी मिरवणुका काढण्यात आल्या.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मटकरी, सहाय्यक निर्णय अधिकारी व मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे, दीपक पवार यांनी प्रभावी नियोजन केल्याने निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली. पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे, निरीक्षक जितेंद्र शहाणे यांच्यासह पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

  • राजकीय विश्लेषकांचे मत : वाईत बदलाची नांदी

वाई नगरपालिकेचा हा निकाल केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित न राहता जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम करणारा ठरतो आहे. मंत्री मकरंद पाटील यांचा प्रभाव असलेल्या वाईत भाजपाने नगराध्यक्षपद जिंकून घेतलेली ही ‘मुसंडी’ आगामी राजकारणाची दिशा ठरवणारी मानली जात आहे.

  • वाई नगरपरिषद निकाल : सत्ता, समन्वय आणि ‘किंगमेकर’चे राजकारण

वाई नगरपरिषदेच्या निवडणूक निकालाकडे केवळ विजयी–पराभूत आकड्यांच्या चौकटीत पाहणे अपुरे ठरेल. हा निकाल स्थानिक राजकारणातील बदलती मानसिकता, पक्षांतर्गत समन्वय, नेतृत्वाची स्वीकारार्हता आणि मतदारांच्या रणनीतिक मतदानाचे स्पष्ट संकेत देणारा आहे.
भाजपचा अजेंडा आणि नेतृत्वाचा चेहरा निर्णायक
भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत आपला विकासात्मक अजेंडा प्रभावीपणे मांडण्यात यश मिळवले. विशेषतः थेट नगराध्यक्ष निवडीत भाजपने दिलेला उमेदवाराचा चेहरा, त्यांची स्वच्छ प्रतिमा, प्रशासनाचा अनुभव आणि लोकांशी असलेला थेट संवाद हे विजयासाठी निर्णायक ठरले. नगरसेवक संख्येत भाजप राष्ट्रवादीपेक्षा मागे असला, तरी ‘शहराचा कारभारी’ म्हणून मतदारांनी भाजपला दिलेली पसंती ही रणनीतिक मतदानाचे स्पष्ट उदाहरणे आहे.

  • राष्ट्रवादी काँग्रेस :

संख्याबळ असूनही नगराध्यक्षपद गेल्यामुळे धक्का
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हा सर्वाधिक १२ नगरसेवकांसह नगरपरिषदेत मोठा पक्ष ठरला आहे. मात्र नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत प्रा. डॉ. नितीन कदम यांचा पराभव हा पक्षातील अंतर्गत समन्वयाच्या अभावाकडे थेट बोट दाखवतो. अनेक प्रभागांमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांना भरघोस मतदान झाले; पण तेच मतदान नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराकडे ‘ट्रान्सफर’ करण्यात पक्ष कमी पडल्याचे स्पष्ट दिसून आले. यामागे स्थानिक गटबाजी, प्रचारातील विसंगती आणि नेतृत्वाबाबत मतदारांमध्ये असलेली संभ्रमावस्था कारणीभूत ठरल्याचे चित्र आहे.

  • अपक्ष सुशील खरात : ‘किंगमेकर’ची भूमिका

प्रभाग ९ मधून अपक्ष उमेदवार सुशील खरात यांचा विजय हा या निकालातील सर्वात महत्त्वाचा राजकीय घटक ठरतो. राष्ट्रवादीकडे १२ आणि भाजपकडे १० नगरसेवक आहेत. कोणत्याही पक्षाकडे स्पष्ट बहुमत नाही. नगराध्यक्ष भाजपचा असल्याने धोरणात्मक निर्णय, निधी वाटप आणि विकासकामांच्या प्राधान्यक्रमात राजकीय ताण निर्माण होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत अपक्ष उमेदवाराची भूमिका निर्णायक ठरणार असून, आगामी सत्तास्थापनेत ‘किंगमेकर’ची भूमिका बजावण्याची क्षमता सुशील खरात यांच्याकडे राहणार आहे.

  • ना. मकरंद पाटील यांच्यासाठी इशारा

हा निकाल मदत व पुनर्वसन मंत्री ना. मकरंद पाटील यांच्यासाठी राजकीयदृष्ट्या धोक्याची घंटा मानली जात आहे. वाई हा त्यांचा बालेकिल्ला समजला जात असताना नगराध्यक्षपद भाजपकडे जाणे ही त्यांच्या नेतृत्वापुढील गंभीर आव्हाने अधोरेखित करते. स्थानिक पातळीवरील असंतोष, संघटनात्मक शिथिलता आणि समन्वयाचा अभाव भविष्यातील राजकारणासाठी पुनर्विचाराची गरज दर्शवतो.

  • भाजप कार्यकर्त्यांसाठी ‘बूस्टर डोस’

दुसरीकडे, भाजपसाठी हा निकाल कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणारा ठरतो. संख्याबळ कमी असूनही नगराध्यक्षपद जिंकणे म्हणजे भाजपच्या स्थानिक संघटनाची ताकद, प्रभावी प्रचार आणि मतदारांशी असलेली थेट नाळ यांची पोचपावती आहे.

  • काँग्रेसचा ‘एकला चलो रे’ प्रयोग अपयशी

वाई नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रीय भारतीय काँग्रेसने महाविकास आघाडीपासून फारकत घेत ‘एकला चलो रे’ची भूमिका स्वीकारली. मात्र हा निर्णय राजकीयदृष्ट्या आत्मघातकी ठरल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. आघाडीचे घटक पक्ष सोबत नसल्याने काँग्रेसचे उमेदवार प्रचारात एकाकी पडले. कार्यकर्त्यांचे मनोबल खच्ची झाले आणि मविआची पारंपरिक व्होट बँक विभागली गेली. परिणामी काँग्रेसला ना संख्याबळ मिळाले, ना निर्णायक प्रभाव.

  • मतदारांचा स्पष्ट संदेश

या निकालातून वाईच्या मतदारांनी एक स्पष्ट संदेश दिला आहे—
एकाच पक्षाकडे संपूर्ण सत्ता न देता, सत्तेचे विकेंद्रीकरण.
राष्ट्रवादीला सर्वात मोठा पक्ष बनवतानाच, नगराध्यक्ष म्हणून भाजपला पसंती देणे हा संतुलित आणि जागरूक मतदानाचा प्रयोग आहे.

  • विजयाचा जल्लोष आणि शांततेत पार पडलेली निवडणूक

निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी वाई शहरात गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी केली. नवनिर्वाचित नगराध्यक्ष अनिल सावंत यांची शहरातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.

“हा विजय वाईच्या जनतेचा आणि विकासाचा विजय आहे,” अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी संकल्प न्यूजशी बोलताना दिली.

दरम्यान, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सोनाली मेटकरी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व पालिकेच्या मुख्याधिकारी संजीवनी दळवी, नायब तहसीलदार भाऊसाहेब जगदाळे व दीपक पवार यांनी योग्य नियोजन केल्यामुळे संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.
पोलीस उपअधीक्षक सुनील साळुंखे, पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे, उपनिरीक्षक सुधीर वाळूज, अमोल गवळी यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार न घडता निकाल प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली.

  • वाई नगरपरिषद : प्रभागनिहाय विजयी उमेदवार व मतदान
  • प्रभाग १

▪ अपर्णा जमदाडे (भाजप) – १०६८
▪ प्रसाद बनकर (भाजप) – ११५३

  • प्रभाग २

▪ घनश्याम चक्के (राष्ट्रवादी) – ११३१
▪ पद्मा जाधव (भाजप) – १४१३

  • प्रभाग ३

▪ संदीप जावळे (राष्ट्रवादी) – १२८५
▪ डॉ. जिवीता जमदाडे (राष्ट्रवादी) – १४२२

  • प्रभाग ४

▪ शारदा काळे (राष्ट्रवादी) – ११६२
▪ संग्राम पवार (राष्ट्रवादी) – ११८५

  • प्रभाग ५

▪ भारत खामकर (राष्ट्रवादी) – ९५६
▪ ज्योती गांधी (भाजप) – १०१५

  • प्रभाग ६

▪ जागृती पोरे (भाजप) – १०२४
▪ विजय ढेकाणे (भाजप) – १०६१

  • प्रभाग ७

▪ शैलेंद्र देवकुळे (राष्ट्रवादी) – ९२४
▪ केतकी मोरे-पाटणे (भाजप) – ९९६

  • प्रभाग ८

▪ अजित शिंदे (राष्ट्रवादी) – ९०९
▪ डॉ. पद्मश्री चोरगे (राष्ट्रवादी) – १३५२

  • प्रभाग ९

▪ रेखा जाधव (राष्ट्रवादी) – बिनविरोध
▪ सुशील खरात (अपक्ष) – ९४५

  • प्रभाग १०

▪ नीलिमा खरात (राष्ट्रवादी) – ९४२
▪ गुरुप्रसाद चव्हाण (राष्ट्रवादी) – ९२८

  • प्रभाग ११

▪ संग्राम सपकाळ (भाजप) – १५०३
▪ दिपाली सावंत (भाजप) – १३९८
▪ नूतन मालुसरे (भाजप) – १४३५

✦ या निवडणुकीत भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रत्येक प्रभागात तीव्र चुरस दिसून आली, तर प्रभाग ९ मधील अपक्ष विजयाने निकालाला वेगळे वळण दिले.

निष्कर्ष : वाई नगरपरिषद निवडणूक निकाल हा केवळ स्थानिक राजकीय संघर्ष न राहता आगामी काळातील तालुका व जिल्हा स्तरीय राजकारणासाठी दिशादर्शक ठरणारा आहे. सत्ता स्थापनेच्या गणितात पुढील हालचाली, आघाड्या आणि अपक्षाची भूमिका यावरच वाईचे विकासाचे धोरण ठरणार आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!