इंग्लिश स्कूल, बोरगांव येथे वार्षिक क्रीडा स्पर्धांचा दिमाखदार समारोप
![]()
श्री. नितीन भिलारे यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांना क्रीडेचे महत्त्व अधोरेखित
वाई : वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसार मंडळ, बोरगांव संचलित न्यू इंग्लिश स्कूल, बोरगांव व भागशाळा नांदगणे (ता. वाई, जि. सातारा) येथे आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धांचा समारोप सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात दिमाखात पार पडला. या समारोप सोहळ्यास क्रीडा प्रेमी व पर्यावरण स्नेही श्री. नितीन भिलारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
समारोपप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना श्री. नितीन भिलारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासात क्रीडेचे अनन्यसाधारण महत्त्व विशद केले. खेळामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक बळ, शिस्त, संयम, संघभावना व नेतृत्वगुण विकसित होतात. शिक्षणासोबत क्रीडेला प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य अधिक सक्षम व उज्ज्वल होते, असे त्यांनी प्रतिपादन केले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी गुणवत्ता असून योग्य संधी व मार्गदर्शन मिळाल्यास ते राज्य व राष्ट्रीय स्तरावर यश मिळवू शकतात, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी श्री. भिलारे यांनी शाळेतील क्रीडा उपक्रमांसाठी आर्थिक मदत जाहीर केली तसेच वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी बेडवरील गाद्या उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक बांधिलकीचे उपस्थित मान्यवर, शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
कार्यक्रमात सुप्रसिद्ध निवेदक श्री. प्रमोद पवार यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व सामाजिक कार्यात सक्रिय असलेले श्री. सुनील वाडकर व श्री. गणेश वाडकर यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वाई तालुका पश्चिम भाग शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष श्री. नारायण वाडकर हे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी शाळेच्या शैक्षणिक व क्रीडाविषयक प्रगतीचा आढावा घेत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात असल्याचे नमूद केले.
या क्रीडा स्पर्धांमध्ये शाळेतील विविध वयोगटांतील विद्यार्थ्यांनी धावणे, उड्या, मैदानी खेळ व संघखेळ अशा विविध स्पर्धांत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. समारोपप्रसंगी विविध स्पर्धांतील विजेत्या व सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे व प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.
या यशस्वी कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री. नारायण गणपत वाडकर, माजी अध्यक्ष श्री. लक्ष्मणराव बाजीबा वाडकर, सचिव श्री. मधुकर किसन वाडकर, माजी संचालक श्री. आनंद नारायण वाडकर, श्री. भिवाजी मारुती शिंदे, समाजसेवक श्री. राम आनंदा वाडकर तसेच सर्व संचालक व कमिटी सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन क्रीडा विभाग प्रमुख श्री. अजित वाडकर, भागशाळा प्रमुख श्री. विठ्ठल जाधव व मुख्याध्यापक श्री. संतोष वाडकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या सहकार्यामुळे हा क्रीडा समारोप सोहळा अत्यंत यशस्वी व संस्मरणीय ठरला.













