Thu, Jan 15, 2026
क्राईम न्यूज

पाचगणीत ५ लाखांचे कोकेन जप्त; ४२.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

पाचगणीत ५ लाखांचे कोकेन जप्त; ४२.८५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Ashok Ithape
  • PublishedDecember 17, 2025

स्थानिक गुन्हे शाखा सातारा व पाचगणी पोलिसांची संयुक्त कारवाई; १० आरोपी अटकेत

पाचगणी (प्रतिनिधी) : सातारा जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात राबविण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत पाचगणी येथे मोठी कारवाई करण्यात आली असून, सुमारे ५ लाख रुपये किमतीचे कोकेन जप्त करण्यात आले आहे. यासोबतच दोन आलिशान चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेटसह एकूण ४२ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या प्रकरणी १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री, वाहतूक व साठ्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दि. १७ डिसेंबर २०२५ रोजी पाचगणी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना विश्वसनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, पाचगणीतील घाटजाई मंदिर परिसरात काही इसम कोकेन विक्रीसाठी आले आहेत.

या माहितीच्या आधारे पाचगणी पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांच्या संयुक्त पथकाने विस्टा ग्रँड सोसायटीतील इस्टेला ‘ए’ बंगल्यासमोरील पार्किंगमध्ये छापा टाकला. छाप्यात स्कोडा रॅपीड (MH-02-DN-0259) व एम.जी. हेक्टर (MH-01-DK-8802) या वाहनांमध्ये संशयित इसम आढळून आले. झडतीदरम्यान त्यांच्या ताब्यातून कोकेनसदृश अंमली पदार्थ, दोन चारचाकी वाहने व मोबाईल हँडसेट जप्त करण्यात आले.

चौकशीत सदर अंमली पदार्थ पाचगणी शहरात विक्रीसाठी आणल्याची कबुली आरोपींनी दिली. याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक ३०५/२०२५, एन.डी.पी.एस. कायदा कलम ८ (क), २१ (ब) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर (स्थानिक गुन्हे शाखा, सातारा) करीत आहेत.

ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे (वाई विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक तुषार दोशी व अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी सहभागी अधिकारी व अंमलदारांचे अभिनंदन केले आहे.

अटक आरोपी :
महंमद नावेद सलिम परमार, सोहेल हशद खान, महंमद ओएस रिजवान अन्सारी, वासिल हमीद खान, महंमद साहिल अन्सारी, जिशान इरफान शेख, सैफ अली कुरेशी, महंमद उबेद सिध्दीकी, अली अजगर सादिक राजकोटवाला व राहिद मुख्तार शेख (सर्व रा. मुंबई; वय २७ ते ३५).

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!