बावधन ग्रामपंचायत सदस्यपदावरून शुभांगी कांबळे अपात्र
![]()
सलग सात सभांना गैरहजर;
वाई प्रतिनिधी | वाई, दि. १५ :वाई तालुक्यातील बावधन ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ. शुभांगी संतोष कांबळे यांची सलग सात मासिक सभांना गैरहजर राहिल्याने ग्रामपंचायत सदस्यपदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती याशनी नागराजन (भाप्रसे) यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या कलम ४०(१) अंतर्गत ही कारवाई केली आहे.
बावधन ग्रामपंचायतीत दोन आघाड्या असून, त्यांच्यात वाद निर्माण करून राजकीय समिकरण बिघडविण्याचा प्रयत्न केल्याने गावात वारंवार राजकीय कलह निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संदीप पिसाळ व शिवसेना (उबाठा) गटाचे वाई तालुका उपप्रमुख विवेक भोसले यांनी सौ. कांबळे यांच्याविरोधात पुराव्यासह तक्रार दाखल केली होती.
दि. २८ ऑगस्ट २०२५ रोजी जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे अपात्रतेबाबत अर्ज सादर करण्यात आला होता. त्यानुसार सौ. कांबळे या दि. १७ फेब्रुवारी २०२५ ते दि. २० ऑगस्ट २०२५ या कालावधीत झालेल्या ग्रामपंचायतीच्या मासिक सभांना अनुपस्थित का राहिल्या, याबाबत खुलासा करण्यासाठी दि. १ डिसेंबर २०२५ रोजी सुनावणीसाठी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी कोणताही लेखी खुलासा सादर केला नाही तसेच त्या स्वतःही सुनावणीस अनुपस्थित राहिल्या.
सुनावणीदरम्यान त्यांच्या पती संतोष कांबळे उपस्थित राहिले; मात्र कायद्यानुसार सदस्याच्या वतीने पतीला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. अभिलेख तपासणीत सौ. कांबळे यांची सलग सात मासिक सभांना गैरहजेरी आढळून आली. याआधी गटविकास अधिकारी यांनीही ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात दोन वेळा संधी दिली होती; मात्र त्या वेळीही त्यांनी आपले म्हणणे मांडले नव्हते.
गटविकास अधिकारी यांचा अहवाल व ग्रामपंचायत रेकॉर्डच्या आधारे सौ. शुभांगी कांबळे यांना ग्रामपंचायत सदस्यपदावरून हटविण्याचा आदेश देण्यात आला असल्याची माहिती विवेक भोसले व संदीप पिसाळ यांनी दिली.













