Thu, Jan 15, 2026
मनोरंजन

‘स्किन ऑफ युथ’ : ट्रान्सजेंडर म्हणून ओळख, प्रेम आणि जिद्दीची शक्तिशाली कहाणी

‘स्किन ऑफ युथ’ : ट्रान्सजेंडर म्हणून ओळख, प्रेम आणि जिद्दीची शक्तिशाली कहाणी
Ashok Ithape
  • PublishedNovember 28, 2025

‘स्किन ऑफ युथ’ या व्हिएतनामी चित्रपटाने पटकावला इफ्फी (IFFI) 2025 चा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठीचा प्रतिष्ठेचा गोल्डन पीकॉक (सुवर्ण मयूर) पुरस्कार

IFFIWood, 28 नोव्‍हेंबर 2025

बंधू आणि भगिनींनो,

तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे, हे वातावरण उर्जेने भारून जाऊ दे आणि तुमच्या टाळ्यांच्या कडकडाटाचा गजर होऊ दे…

इफ्फीचा राजमुकुट, सुवर्ण मयूर आता आपल्या नव्या मानकऱ्याच्या हाती विसावण्यासाठी सज्ज आहे.

गोव्यातील डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये आज झालेल्या इफ्फीच्या शानदार समारोप समारंभात व्हिएतनामी चित्रपट “स्किन ऑफ युथ” ला इफ्फीचा सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठीचा प्रतिष्ठेचा गोल्डन पीकॉक (सुवर्ण मयूर) पुरस्कार मिळाला.  चित्रपटाची दिग्दर्शिका एॅशली  मेफेअर यांना केंद्रीय माहिती व प्रसारण आणि संसदीय व्यवहार राज्यमंत्री एल मुरुगन आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते सुवर्ण मयूर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

चित्रपटाच्या  दिग्दर्शक अ‍ॅशली  मेफेअर आणि निर्माते ट्रान थी बिच न्गेक, फ्रान बोर्जिया यांना एकत्रितपणे हा पुरस्कार घोषित झाला असून, गोल्डन पीकॉक मानचिन्ह, प्रमाणपत्र, आणि रोख रु. 40,00,000, असे त्याचे स्वरूप आहे.

हा चित्रपट 1990 च्या दशकात सायगावमधील लिंग बदल शस्त्रक्रियेचे स्वप्न पाहणारी ट्रान्सजेंडर सेक्स वर्कर सॅन आणि आपल्या मुलाला आधार देण्यासाठी भूमिगत राहून लढा देणारी नाम यांच्यातील अशांत प्रेमकथेचा वेध घेतो. सॅन एक स्त्री म्हणून जगण्याचा दृढनिश्चय करते, तर नाम तिच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे पैसे जमवण्यासाठी  कठीण आव्हानांचा सामना करते.  त्यांच्या प्रेमाला पदोपदी कठोर आव्हानांचा सामना करावा लागतो कारण त्यांना हिंसक भूमिगत जग, सामाजिक पूर्वग्रह आणि त्यांच्या नात्याचा बळी घेऊ शकणाऱ्या अंधाऱ्या शक्तींशी लढावे लागते.

ज्युरींनी (निवड समिती) या चित्रपटाबद्दल आपले मत मांडताना सांगितले, “पहिल्याच फ्रेमपासून मंत्रमुग्ध करणारा, प्रेरणादायी छायाचित्रण आणि धाडसी निर्मितीने सजलेला हा चित्रपट असून दिग्दर्शकाने दोन अप्रतिम प्रमुख कलाकारांकडून विलक्षण अभिनय उलगडून दाखवला आहे. चित्रपटाचा प्रत्येक घटक—अर्थात भावस्पर्शी संगीत, कौशल्यपूर्ण संपादन आणि बारकाईने घडवलेले तांत्रिक कौशल्य यांचा अत्यंत सुरेख संगम दाखवला आहे. धाडसी आणि शूर, शैलीदार आणि आकर्षक असा हा चित्रपट अशा जगात प्रेम आणि त्यागाचा शोध घेतो ज्याची झलक आपल्यापैकी फार कमी जणांना दिसते.ही कलाकृती आपल्या सर्वांच्या मनात दीर्घकाळपर्यंत रेंगाळत राहील.”

या चित्रपटाबद्दल बोलताना, दिग्दर्शक अ‍ॅशली  मेफेअर म्हणाल्या, “ही एक अतिशय वैयक्तिक कथा आहे. मी तीन भावंडांपैकी एक आहे आणि माझे धाकटे भावंडं  ट्रान्सजेंडर आहे. हा चित्रपट तिच्या प्रवासाचा, तिचा सन्मान, तिचे हक्क, तिचे भय आणि तिची स्वतःची ओळख यांचा वेध घेतो. मला खात्री आहे की तिची कहाणी ट्रान्सजेंडर समुदायातील अनेकांना आपलीच कहाणी वाटेल.”

या वर्षी, जागतिक चित्रपटसृष्टीच्या चैतन्यशील परिदृश्याचे प्रतिनिधित्व करणारे पंधरा चित्रपट इफ्फी 2025 मध्ये प्रतिष्ठित ‘सुवर्ण मयूर’पुरस्कारासाठी स्पर्धेच्या रिंगणात होते.

इफ्फीविषयी

वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच  कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!