इफ्फीच्या तिसऱ्या दिवसाने भारतातील लोकपरंपरांवर टाकला प्रकाशझोत
![]()
IFFIWood, 22 नोव्हेंबर 2025
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) 2025 तिसऱ्या दिवशीच्या कार्यक्रमांनी गोव्यात पणजी येथे असलेल्या आयनॉक्सला देशातील वैविध्यपूर्ण कलाकृतींच्या रंगबिरंगी शोकेसमध्ये रुपांतरीत केले. रुपेरी पडद्याच्या पलीकडे जात या सायंकाळी, कलाकारांची उर्जा, विविधता आणि पिढ्यानपिढ्या चालत आलेला समृध्द वारसा यांना अधोरेखित करणाऱ्या पारंपरिक लोकनृत्यांच्या मालिका आणि नाट्यमय कथाकथन यांच्या सादरीकरणातून भारताच्या सांस्कृतिक हृदयस्पंदनांचा थक्क करून टाकणारा सोहळा सादर झाला. केंद्रीय संचार ब्युरोच्या समर्पित पीआरटीज सह विविध राज्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कलाकारांनी चित्रपट रसिकांना या उपखंडाच्या जिवंत परंपरेशी जोडण्यासाठी रंगमंचाचा ताबा घेतला.
सादर झालेले कार्यक्रम: संपूर्ण भारतातून केलेला दृश्यात्मक प्रवास
गुस्साडी (तेलंगणा)
आदिलाबाद येथील पद्मश्री कंकराजू गुस्साडी नृत्य संस्थेतील आदिवासी गोंड कलाकारांनी हे उर्जेने सळसळते, लयबद्ध समूह नृत्य सादर केले. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित श्री गुस्साडी कंकराजू यांचा सशक्त वारसा पुढे नेणाऱ्या, रंगीबेरंगी, लांब झगे घातलेल्या, मोरपंखांच्या वेगळ्या पद्धतीच्या पगड्या आणि किणकिणत्या घंटा घातलेल्या कलाकारांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

महिषासुर मर्दिनी (पश्चिम बंगाल)
वाईटावर चांगल्याच्या विजयाचे सशक्तपणे दर्शन घडवणारा नाट्यमय लोकनाट्य-वजा नृत्य रॉयल छऊ अकादमीच्या कलाकारांनी सादर केले. या सादरीकरणात दुर्गा देवी आणि महिषासुर राक्षसामध्ये झालेल्या भयंकर युद्धाचे ठळक चित्रण केले होते. यामध्ये प्रेक्षकांना इतर प्रमुख देवतांचे दर्शन आणि छऊ शैलीचे दर्शन घडवणारे आकर्षक युध्द नृत्य दिग्दर्शन देखील बघायला मिळाले.

संबळपुरी लोक नृत्य – चुटकुचुटा (ओदिशा)
कटक येथील लोक शास्त्र कला परिषदेच्या कलाकारांनी तीव्र ताल आणि सामर्थ्यासह हा नृत्यप्रकार पेश केला. या दमदार समूह नृत्यातून प्रेक्षकांना ओदिशाच्या पश्चिम भागातील सशक्त, उत्सवी पारंपरिक नृत्य संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या ढालखाई आणि रासेर केली यांसारख्या सुप्रसिध्द संबळपुरी प्रकारांचा अनोखा मिलाफ अनुभवायला मिळाला.

तारपा नृत्य (दमण आणि दीव/महाराष्ट्र)
पीपल्स अॅक्शन फॉर सोशल डेव्हलपमेंट या संस्थेने सादर केलेले हे संमोहित करणारे पारंपरिक आदिवासी समूह नृत्य ‘तारपा’ या भोपळा, बांबू आणि मेणापासून तयार केलेल्या अनोख्या वायुवाद्याभोवती रचलेले होते. तारपा वाजवणारा कलाकार मार्गदर्शक म्हणून काम करताना, समूहाच्या एकत्रित हालचालींची दिशा तसेच सामुहिक लय यांचे नियंत्रण करतो.

चारी नृत्य (राजस्थान)
नवी दिल्ली येथील श्री नटराज कला केंद्रातील महिलांच्या समूहाने चारी नृत्याचा देखणेपणा आणि परंपरा दाखवून दिली. गुर्जर समाजात लोकप्रिय असलेल्या या नृत्यात सादरकर्त्या कलाकारांनी चमकती पितळी भांडी (चारी) अत्यंत कौशल्याने त्यांच्या डोक्यांवर तोलली. सौंदर्य आणि शोभा यांचे प्रतीक असलेला हा नृत्यप्रकार अजमेर आणि किशनगड येथील लग्न समारंभ आणि उत्सवांचा अविभाज्य भाग असतो.

लावणी (महाराष्ट्र)
नवी दिल्लीच्या हमराज आर्ट संस्थेने महाराष्ट्रातील पारंपरिक लोकनृत्य आणि संगीत सादर केले. ताल आणि लय यांच्या साथीने नऊवारी साडीतील नृत्यांगनांनी सादर केलेल्या जोशपूर्ण नृत्याने, मोहक हावभावांनी आणि भावनात्मक कथाकथनाने प्रेक्षकांची मने जिंकली.

राम वंदना (आसाम)
15 व्या शतकातील आसामी संत आणि सुधारक श्रीमंत शंकरदेव यांनी लिहिलेल्या ‘राम विजय’ नाटकातील एक प्रसंग गुवाहाटीच्या सीबीसी संस्थेच्या कलाकारांनी सादर केला. या भक्तीमय, सुंदर सादरीकरणामध्ये ‘सात्रिय’ या शास्त्रीय नृत्य प्रकारात आध्यामिक कथा गुंफण्यात आली होती.

बिहू (आसाम)
गुवाहाटीतील आसाम शिल्पी समाज संस्थेने कार्यक्रमाच्या शेवटी बिहू हे पारंपरिक लोकनृत्य सादर केले. तरुण मुला मुलींनी सुंदर पोशाखात, उत्साहाने, द्रुत गतीने सादर केलेल्या या नृत्याला ढोल, पेपा (म्हशीच्या शिंगाचे वाद्य) आणि गोगोना (बांबूचे वाद्य) यासारख्या पारंपरिक वाद्यांची साथ लाभली होती. शेतीतील सुगीच्या हंगामांचा उत्साह यातून दिसून आला.

काश्मीर आणि हिमाचलमधल्या नृत्यांनीही कार्यक्रमाची रंगत वाढवली. या मनमोहक सादरीकरणाने प्रेक्षकांना उत्तरेकडील पर्वतराजीचे दर्शन घडवले. काश्मीरमधल्या पारंपरिक लोक नृत्य कलाकारांनी काश्मीरचे दैवी सौंदर्य आणि त्यांच्या परंपरागत कथाकथनशैलीतून संपूर्ण परिसर मंत्रमुग्ध केला. हिमाचल प्रदेशातील लोक नृत्यातून त्यांच्या अनोख्या, उत्सवी संस्कृतीचे आणि रंगीबेरंगी पोशाखाचे दर्शन घडले. या कार्यक्रमाच्या सांस्कृतिक समृद्धतेला त्यांचे सादरीकरण एका वेगळ्या उंचीवर घेऊन गेले.

इफ्फीमध्ये तिसऱ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक सत्रामुळे चित्रपटांच्या भाऊगर्दीत प्रेक्षकांना समृद्ध, सघन विराम मिळाला. हा महोत्सव केवळ चित्रपटाच्या पडद्यापुरता मर्यादित नाही तर भारताच्या सर्जनशील आणि सांस्कृतिक वैशिष्ट्यांचे दर्शन घडवणाऱ्या वैविध्यपूर्ण, जिवंत कलाप्रकारांचाही असल्याचे यातून सिद्ध झाले. शेवटी सादर झालेल्या बिहू नृत्याला टाळ्यांच्या गजरात प्रेक्षकांनी दिलेली दाद कला आणि परंपरा यांच्यातील सामर्थ्याचे उदाहरण होते.
इफ्फीविषयी
वर्ष 1952 मध्ये सुरु झालेला भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (इफ्फी) हा दक्षिण आशियात सर्वप्रथम सुरु झालेला आणि चित्रपटांशी संबंधित असा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ (एनएफडीसी), केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय, एन्टरटेनमेंट सोसायटी ऑफ गोवा (ईएसजी) ही संस्था तसेच गोवा राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित होत असलेला हा महोत्सव आता, जेथे पुनर्संचयित अभिजात कलाकृती धाडसी प्रयोगांना सामोऱ्या जातात आणि दिग्गज कलाकार निर्भय नव-कलाकारांसोबत एकत्र येऊन काम करतात, अशा जागतिक चित्रपटीय शक्तीकेंद्राच्या रुपात उदयाला आला आहे. इफ्फीला खऱ्या अर्थाने चमकदार स्वरूप देणारे घटक म्हणजे त्यातील विजेसारख्या तळपणाऱ्या मिश्र आंतरराष्ट्रीय स्पर्धा, सांस्कृतिक सादरीकरणे, मास्टर क्लासेस,श्रद्धांजलीपर उपक्रम तसेच कल्पना, व्यवहार आणि सहयोगी संबंधांना झेप घेऊ देणारा, चैतन्याने भारलेला वेव्हज चित्रपट बाजार. गोव्यातील जबरदस्त आकर्षक समुद्रकिनाऱ्याच्या पार्श्वभूमीवर, 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान होत असलेला महोत्सवाचा 56 वा भाग भाषा, शैली, नवोन्मेष आणि आवाजांचा झळाळता पिसारा घेऊन जागतिक मंचावर भारताच्या सर्जक प्रतिभेचा गुंगवून टाकणारा सोहळा सादर करत आहे.

* * *
PIB IFFI CAST AND CREW | सुषमा काणे/संजना चिटणीस/सुरेखा जोशी/दर्शना राणे | IFFI 56













