Thu, Jan 15, 2026
कलाकार कट्टा

पश्चिम क्षेत्राच्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात शनिवारी 5 राज्यांचे 5 संघ स्पर्धेत उतरणार

पश्चिम क्षेत्राच्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सवात शनिवारी 5 राज्यांचे 5 संघ स्पर्धेत उतरणार
Ashok Ithape
  • PublishedNovember 21, 2025

मुंबईचे नेहरू विज्ञान केंद्र भूषवणार ‘अखिल मानव्याच्या हितासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या मध्यवर्ती संकल्पनेभोवती गुंफलेल्या कार्यक्रमाचे यजमानपद

मुंबई, 21 नोव्हेंबर 2025

मुंबईतील नेहरू विज्ञान केंद्र, शनिवार, 22 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईतील त्यांच्या परिसरात पश्चिम क्षेत्रासाठी राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव (NSDF) 2025–26 आयोजित करण्यासाठी संपूर्ण सिद्ध झाले आहे.

‘अखिल मानव्याच्या हितासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान’ या मध्यवर्ती संकल्पनेने, सहभागी संघांना महत्त्वाच्या वैज्ञानिक आणि सामाजिक विषयांवर प्रभावी कथा सादर करण्यास प्रेरित केले आहे. विद्यार्थ्यांचे गट हिंदी आणि मराठीतून — विज्ञानातील स्त्रिया, स्मार्ट शेती, डिजिटल भारत-: जीवनाचे सक्षमीकरण, सर्वांसाठी स्वच्छता आणि हरित तंत्रज्ञान– यासारख्या विषयांवर मूळ/स्वतःची नाटके सादर करतील.

या महोत्सवाचे उद्घाटन शनिवार, 22 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 9:30 वाजता सुप्रसिद्ध मराठी अभिनेते आणि मुंबईतील वास्तुविशारद राजन भिसे यांच्या हस्ते होईल.

सायंकाळी 5:00 वाजता सांगता समारंभ आणि बक्षीस वितरणाने कार्यक्रमाचा समारोप होईल.

संबंधित राज्यांचे प्रतिनिधित्व करणारे पाच विजेते संघ 2025–26 च्या पश्चिम विभागीय स्तरावरील विज्ञान नाट्य स्पर्धेत भाग घेतील:

1. गव्हर्नमेंट एच.एस.एस., धमतरी, छत्तीसगड
2. गव्हर्नमेंट गर्ल्स एच.एस.  स्कूल, केसली, मध्यप्रदेश
3. शांतिनिकेतन माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यामंदिर, महाराष्ट्र
4. भारतीय विद्या भवन विद्याश्रम, जयपूर, राजस्थान
5. भाटीकर मॉडेल हायस्कूल, गोवा

पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट दोन संघ 6–7 जानेवारी 2025 रोजी कोलकाता येथील बिर्ला इंडस्ट्रियल अँड टेक्नॉलॉजिकल म्युझियम (BITM) येथे होणाऱ्या राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव 2025–26 मध्ये आपल्या क्षेत्राचे प्रतिनिधित्व करतील.

दरवर्षी, भारतातील जवळजवळ सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर विज्ञान नाट्य स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्यानंतर प्रत्येक राज्यातील विजेते संघ उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम आणि ईशान्य अशा पाच विभागीय महोत्सवांपैकी एकामध्ये भाग घेण्यासाठी पुढे जातात. यामुळे तरुण वैज्ञानिक मनांसाठी एनएसडीएफ हे खरोखरच एक राष्ट्रीय व्यासपीठ बनते.

हा कार्यक्रम प्रादेशिक अकादमी प्राधिकरण; राज्य विज्ञान शिक्षण संस्था, नागपूर (महाराष्ट्र); दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग; राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (SCERT), रायपूर (छत्तीसगड); SCERT गोवा; गुजरात विज्ञान आणि तंत्रज्ञान परिषद (GUJCOST), गांधीनगर; राज्य विज्ञान शिक्षण संस्था आणि शिक्षक शिक्षण महाविद्यालय, जबलपूर (मध्य प्रदेश); आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, जयपूर (राजस्थान) यांच्या सहयोगाने आयोजित केला जात आहे.

विविध सांस्कृतिक आणि भाषिक पार्श्वभूमींतील विद्यार्थ्यांना एकत्र आणून, वैज्ञानिक संवादाचे एक शक्तिशाली माध्यम म्हणून रंगभूमीचा शोध घेणे असे या महोत्सवाचे उद्दिष्ट आहे.

राष्ट्रीय विज्ञान संग्रहालये परिषद (NCSM) ही भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत येणारी एक स्वायत्त वैज्ञानिक आणि संशोधन संस्था असून,तिच्या अंतर्गत कार्यरत असणाऱ्या नेहरू विज्ञान केंद्राने – विज्ञानाला जनतेच्या, विशेषतः विद्यार्थ्यांच्या जवळ आणण्याच्या दीर्घकालीन ध्येयाकडे वाटचाल सुरू ठेवली आहे. देशभरात विज्ञान लोकप्रिय करण्याच्या उपक्रमांचा एक भाग म्हणून, ‘एनसीएसएम’ वैज्ञानिक दृष्टिकोनाचे पोषण करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित करते. सर्जनशील वैज्ञानिक अभिव्यक्तीसाठी पोषक वातावरण देणारा राष्ट्रीय विज्ञान नाट्य महोत्सव हा त्यांतील सर्वात उत्साहवर्धक आणि आकर्षक व्यासपीठांपैकी एक आहे.

Ashok Ithape
मुख्य संपादक
Ashok Ithape

गेल्या 20 वर्षांपासून पत्रकारिता, समाजसेवा, शिक्षण आदी विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीची फलश्रुती व परिपुर्ती म्हणजे आमचा हा उपक्रम. आजवर पर्यावरण, शिक्षण, कला-साहित्य, संस्कृती, ग्रामविकास, राजकीय विश्लेषण आदी विविध क्षेत्रांचा आढावा घेत काढलेल्या विशेषांकाच्या, माहितीपटांच्या यशस्वी अनुभवाच्या बळावर आम्ही उचलत आहोत हे नवं पाऊल.

error: Content is protected !!